पुणे Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी "अब की बार गोळीबार सरकार" असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सुळेंच्या या वक्तव्यावर महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर मोहोळ यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही उत्तर दिलंय.
त्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांवर गोळीबार केला : माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "सुप्रियाताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण मी ताईंना आठवण करून देतो, जेव्हा त्यांची राज्यात आणि देशात सत्ता होती तेव्हा त्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांवर गोळीबार केला, शेतकऱ्यांचा जीव घेतला. तसं तरी आम्ही काही केलेलं नाही. बोलायला गेलो तर खूप काही निघेल. परंतु, आम्ही वैयक्तिक बोलत नाही." यावर काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, "शेतकऱ्यांवर गोळीबार झाला तेव्हा पालकमंत्री हे अजित पवार होते." त्यामुळं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन पुण्यातील दोन्ही उमेदवार आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
विरोधक खोटं बोलण्याचं काम करतात : पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. "भाजपाकडून संविधान बदलण्याचं काम केलं जात आहे," अशी टीका विरोधक करत आहेत. यावर मुरलीधर मोहोळ यांना विचारलं असता ते म्हणाले की, "हे शंभर टक्के खोटं आहे. विरोधक हे खोटं बोलण्याचं काम करत आहेत. मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी खूप मोठं काम केलंय. राजकारण हे सरळ केलं पाहिजे, खोटं बोलून राजकारण केलं गेलं नाही पाहिजे."
संविधानच देशाला वाचवू शकतं : यावेळी अभिवादनसाठी आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की, "आज संविधान बदलण्याची चर्चा सुरू आहे. लोकशाही ही धोक्यात आलेली आहे. शेवटचा आधार म्हणून बाबासाहेबांचा हा ग्रंथच या देशाला वाचवू शकतो. भाजपाचे खासदार यांनीच सांगितलं होत की, त्यांना संविधान बदलायचं आहे. त्यांचा संविधान बदलण्याचा डाव जनता हाणून पाडेल. "
हेही वाचा -
- "चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News
- "बारामती लोकसभेची निवडणूक विचाराची लढाई, नात्याची नाही"; सासऱ्यांच्या टीकेवर सुनेचं उत्तर - Sunetra pawar
- पंतप्रधानांच्या हस्ते भाजपाचं 'संकल्प पत्र' जाहीर; 'या' दोन मोठ्या घोषणांसह अनेक आश्वासनं - BJP Manifesto