पंढरपूर Vitthal Rukmini Mandir : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलय. मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्यानं करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्यानं मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलंय. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा हा काळ्या पाषाणानं उठून दिसतोय. राज्य शासनानं मंजूर केलेल्या 73 कोटी रुपयांमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं विकास आराखड्याचं काम सध्या सुरू आहे.
मंदिराचं पुरातन रूप समोर : महिलांसाठी विठ्ठल रुक्मिणीचं केवळ मुखदर्शन सुरू ठेवण्यात आलं होतं. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आणि मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यातील चांदीचा मुलामा केलेले पत्रे तसंच इतर वापरलेलं सर्व साहित्य काढून टाकण्यात आलं असून सातशे वर्षांपूर्वीचं मूळ स्वरूपातील मंदिर पाहायला मिळतय. रविवारी 2 जून रोजी भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू होणार असून नव्या स्वरूपातील पूर्ण दगडी भिंती तसंच शिखराचं देखील काम दिसत आहे. हा गाभारा पाहिल्यानंतर पुरातन काळातील मंदिर कसं होतं हे दिसून येतं. मंदिरातील सर्व कमानी दरवाज्याची चांदी काढल्यामुळं मंदिराला पुरातन रूप प्राप्त झालय.
भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार : मंदिरातील संगमरवरी फरशी तसंच चांदीचा दरवाजाही काढून टाकल्यामुळं काळ्या पाषाणातील मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. 2 जून नंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी मंदिर खुलं राहणार असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं सांगण्यात आलय. दुरुस्तीच्या काळामध्ये मंदिर बंद असल्यानं भाविकांची गर्दी कमी झाली होती. त्याचा मोठा आर्थिक फटका मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांना बसला होता.
हेही वाचा
- मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन
- नागपुरात सूर्य ओकतोय आग; गेल्या चार दिवसांत उष्माघातानं १० जणांचा मृत्यू
- विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, मिहीर कोटेचांना नागरिकांचा घेराव
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, 'भविष्यात तुम्हाला शेतीच...'