नागपूर Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. मौदा तालुक्यामधील अरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शांतीनगर तुमान गावात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. एका घरात तिघांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच मृतांमध्ये एकाच कुटूंबातील पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. त्यामुळं ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्रीनिवास इळपुंगटी (वय-58), पद्मालता इळपुंगटी (वय-54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी अशी मृतांची नावं आहेत.
सकाळपासून घराबाहेर न आल्यानं संशय : गेल्या अनेक वर्षांपासून इळपुंगटी कुटुंबीय मौदा तालुक्यातील तुमान गावात राहत होते. मात्र, गुरुवारी (14 मार्च) सकाळपासून या घरातील एकही जण घराबाहेर न पडल्यानं शेजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिलं असता सर्वांना धक्का बसला. घरात इळपुंगटी पती-पत्नी आणि त्यांचा मुलाचा संशयास्पद अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर तात्काळ ही माहिती अरोली पोलिसांना देण्यात आली.
आत्महत्या की हत्या? लवकरच होईल स्पष्ट : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इळपुंगटी कुटुंबाचा राईस मिलचा व्यवसाय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. तसंच मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली की त्यांचा कुणी खून केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक : दरम्यान, 13 मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच या घटनेसंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -
- Mumbai Murder News: दागिने शोरुम मालकाच्या पत्नीची घरातील नोकराकडून हत्या, बिहारला पळून जाताना रेल्वे स्थानकातून अटक
- वडाळा खून प्रकरणी डीएनए चाचणी होणार; आरोपीचा शोध घेण्यासाठी काश्मीर आणि कोलकाताला पोलीस पथकं रवाना
- मुंबईत बालकांचे 'विकृत शिकारी'; वडाळ्यात बालकाचं धड अन् शिर आढळल्यानं खळबळ, बंगालचा संशयित पळाला