मुंबई Share Market Cheating : मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी अशा एका सायबर गुंडाला अटक केली आहे जो शेअर मार्केटमध्ये चांगला नफा कमवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करायचा. आरोपींनी तक्रारदाराला 4 बँक खात्यात 7 लाख 46 हजार रुपये जमा करायला लावले. तक्रारदाराला कोणत्याही प्रकारचा नफा दिला गेला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तक्रारदाराच्या लक्षात आलं. अखेर त्यानं बोरिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गुंतवणूकदारांना दाखवायचा लाखो रुपयांचे आमिष: आरोपी टेलिग्रामवर ग्रुप तयार करून लोकांना टास्क देत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपी गुंतवणूकदाराला एक टास्क द्यायचा. समोरच्यानं ते पूर्ण केल्यानंतर त्याला विश्वास निर्माण करण्यासाठी त्याच्या खात्यात 50 ते 100 रुपये ट्रान्सफर करायचा. टास्क पूर्ण झाल्यानंतर आरोपी शेअर बाजारातून चांगला नफा देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदाराकडून लाखो रुपये घेत असत. तसेच टास्क मोठे करण्यासाठी तो सशुल्क टास्क देत असत.
फसवणुकीच्या पैशातून सोन्याची खरेदी: तक्रारदाराच्या लक्षात आले तोपर्यंत आरोपी लाखोंची फसवणूक करून फरार झाला होता. तपासादरम्यान आरोपीनं मार्वे येथील सोन्याच्या दुकानातून फसवणुकीच्या पैशातून सोनं खरेदी केल्याचं बोरिवली पोलिसांना समजलं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सोन्याच्या दुकानाचा तपास सुरू केला. हा आरोपी मानसरोवर बिल्डिंग मालवणी, मालाड पश्चिम येथे येणार असल्याची गुप्त माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. बोरिवली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद (२८) असं त्याचं नाव आहे. जो मालाड पश्चिम मालवणी येथील रहिवासी आहे.
आरोपींनी अनेकांची फसवूक केल्याचा संशय : या आरोपीनं टास्कच्या नावाखाली आणि शेअर मार्केटमध्ये चांगला नफा देण्याच्या नावाखाली इतरांची फसवणूक केली आहे का? याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत. त्यांच्या टोळीत आणखी कोणाचा समावेश आहे का? याचीही चाचपणी केली जात आहे.
हेही वाचा: