मुंबई Bail For Law Entrance Exam : हत्येच्या आरोपात दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आणि गेल्या साडे 9 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या याचिकाकर्त्याला एलएलबीची प्रवेश परीक्षा देण्यासाठी फर्लोह ऐवजी अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठाचे न्यायमूर्ती एन.आर. बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी हा निकाल दिला. याचिकाकर्त्याला एक आठवड्यासाठी अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपये कॅशबेल देण्यात आला असून या कालावधीत गुन्हा घडलेल्या ठिकाणी जावू नये असे निर्बंध लादण्यात आले आहेत.
न्यायालयाचे आभार व्यक्त : खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने फर्लोहची मागणी करणाऱ्या वकिलांना त्याऐवजी अंतरीम जामीनासाठी अर्ज करण्यास सुचवले होते. त्याप्रमाणे वकिलांनी अंतरीम जामीनासाठी अर्ज केल्यावर खंडपीठाने एक आठवड्यांचा अंतरीम जामीन मंजूर केला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. इरफान उनवाला, अॅड. प्रशांत पांडे यांनी बाजू मांडली तर सरकारतर्फे अॅड. प्राजक्ता शिंदे यांनी बाजू मांडली. 30 मे रोजी लॉ ची प्रवेश परीक्षा होणार आहे. उच्च न्यायालयाने अंतरीम जामीन दिल्याने याचिकाकर्त्यांचे वकील अॅड उनवाला यांनी न्यायालयाचे आभार व्यक्त केले.
फर्लोह ऐवजी अंतरीम जामीनासाठी अर्ज : याचिकाकर्ता सोहेल अन्सारी विरोधात 2014 मध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने त्याला 23 डिसेंबर 2021 मध्ये दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अटक झाल्यापासून गेली साडेनऊ वर्षांपासून तो तुरुंगात आहे. 2022 मध्ये त्याने एलएलबीच्या प्रवेश परीक्षेसाठी नाशिक तुरुंग अधिक्षकांकडे फर्लोह रजेची मागणी केली. 11 मार्च 2023 ला त्याचा रजेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर पुण्यातील वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेले अपील देखील फेटाळण्यात आले. त्यानंतर तुरुंग विभागाच्या महानिरीक्षकांनी देखील अपील फेटाळल्यानंतर अन्सारीने फर्लोहसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी खंडपीठाने फर्लोह ऐवजी अंतरीम जामीनासाठी अर्ज करण्यास सुचवले होते.
हेही वाचा :
- उन्हाळी सुट्टीत गावाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पाहा मगच घराबाहेर पडा - Train Schedule
- राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
- आमदार शून्य, खासदार एक अन् रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रिपदाचं वेध - RPI President Ramdas Athawale