छत्रपती संभाजीनगर Babajani Durrani Join Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा मोह आणि तपास यंत्रणांच्या कारवाईच्या भीतीनं महायुतीत गेलेल्या नेत्यांना घरवापसीचे वेध लागले आहेत. राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ गेल्या काही वर्षात पाहायला मिळाली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आला. त्याचाच प्रत्यय आता येत आहे. बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडचिट्ठी देत आज दुपारी दोन वाजता औरंगाबाद इथं शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
अजितदादा गटाचे बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली असून ते मूळ गटात प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी परभणीत देखील भेट घेतली होती. मी मनानं शरद पवार यांसोबतच असल्याचंही यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं.
भविष्यात शरद पवार यांच्यासोबत राहील : शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार शहरात दाखल झाले. त्यावेळी रात्री उशिरा बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी "भेटीचे मुख्य कारण म्हणजे भविष्यात मला पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणं याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच आहे," असंही यावेळी बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं. "मी 1985 पासून शरद पवारांसोबत आहे. यापूर्वी सुद्धा मी एका विचारानं काम केलं आहे. समविचारी पक्षासोबत काम करायला सोपं जातं. भिन्न भिन्न विचाराच्या पक्षासोबत काम करायला अवघड जातं. कार्यकर्त्यांनाही अवघड जाते आणि मतदारांनाही अवघड जाते. अजित पवार सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानंच काम करतात. पण त्या ठिकाणी दोन्ही बाजूने जे पक्ष आहेत, त्याच्यामुळे सगळेच आमच्यासारखे अल्पसंख्यांक विचाराच्या कार्यकर्त्याची कुचंबना होते. त्यामुळे आम्हाला काम करणं फार अवघड झालं. एका बाजुला भाजपा तर दुसऱ्या बाजुला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यांच्यात काम करणं म्हणजे अवघड आहे," अशी टीकाही दुर्राणी यांनी केली.
शरद पवार गटात करणार प्रवेश : "शनिवारी दुपारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. या कार्यक्रमात बाबा दुर्राणी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. मी मनानं शरद पवार यांच्या सोबतच आहे. मात्र, फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा बाकी आहे. शरद पवार आणि आम्ही भविष्यात एका विचारानं काम करू. त्यामुळे लवकरच मोठी बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रवेश होणं म्हणजे काही नवीन नाही. शरद पवार यांच्याबरोबर काम करणं म्हणजे प्रवेश केल्यासारखा आहे," असं दुर्राणी यांनी सांगितले.
हेही वाचा