"मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटलांच्या मनात..."; मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन - Deepak Kesarkar on Manoj Jarange - DEEPAK KESARKAR ON MANOJ JARANGE
Deepak Kesarkar Appeal : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं. यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मनात फडणवीस किंवा शिंदे यांच्याविषयी गैरसमज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी (21 जुलै) शिर्डीत व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं सध्या उपोषण सुरू आहे.
Published : Jul 21, 2024, 9:41 PM IST
अहमदनगर(शिर्डी) Deepak Kesarkar Appeal : मराठा आरक्षण देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेहमी सकारात्मक भूमिका राहिली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं; मात्र ते सरकार बदलल्यामुळे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 टक्के आरक्षण दिलं आहे. त्यालासुध्दा पूर्ण पाठिंबा हा फडणवीस यांचा होता; यानंतरही मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काही गैरसमज असेल तर तो त्यांनी काढून टाकावा, असं साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलयं.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत दाखल : शालेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज (21 जुलै) गुरुपौर्णिमा निमित्तानं शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गुरुपौर्णिमा निमित्तानं आमच्या गावी पालखी काढण्यात आली आहे. पालखी नंतर लगेचच शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर आता मुंबई येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं दर्शन घेणार असल्याचंही केसरकर म्हणाले आहेत.
साईमंदिर राहणार रात्रभर खुलं : गुरुपौर्णिमे निमित्तानं लाखो भाविक आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहे. या सर्व भाविकांना साईबाबांचं दर्शन घेता यावं यासाठी साई संस्थानच्यावतीनं सुंदर व्यवस्था करण्यात आली असून आज रात्रभर साईबाबा मंदिर देखील रात्रभर खुलं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व भाविकांना साईबाबांचं दर्शन घेता येणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.
जरांगेंनी बीडमध्ये घेतली होती सभा : मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण आणि मार्गदर्शन मेळावा 6 जुलै पासून आयोजित करण्यात आला होता. बीडमध्ये 11 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि मराठा आरक्षण मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेत मराठा बांधवांमध्ये जनजागृती केली. तर सरकारला 13 जुलै पर्यंत वेळ दिला होता. दिलेली वेळ आता काही दिवसांवर येऊन ठेपली होती. त्यासाठी बीड शहरामध्ये शिवतीर्थ या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय एकत्र आला होता. यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला न्याय न मिळाल्याबद्दल त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली.
हेही वाचा :
- विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा- ओबीसी संघर्षातून ध्रुवीकरण - Maratha VS OBC Reservation
- बीडमध्ये मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले!; छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा घेतला समाचार - Manoj Jarange Patil
- बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली; सर्व शाळांना सुट्टी जाहीर - Manoj Jarange Patil Shantata Rally