छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat : राज ठाकरे यांनी सभेमध्ये जनतेशी संवाद साधला आणि महायुतीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांचे मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यात मी त्यांना भेटलो होतो. त्यांनी याबाबत चर्चा केली होती. त्यांच्या घोषणेचं जनतेनं स्वागत केलं आहे. महायुतीला एक खंबीर नेता मिळाला. राज ठाकरेंचं नेतृत्व आम्ही 40 वर्षांपासून पाहतोय. त्यांना कुणाच्या विरोधात कुणी उभं करू शकत नाही. ते स्वतःच्या हिमतीने पक्ष चालवतात. ते कुणाचीही रिप्लेसमेंट नाहीत. लवकरच राज्यात महायुतीच्या प्रचारात ते उतरतील. त्यांची सभा संभाजीनगरमधे पण घेऊ असं मत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. तर वडेट्टीवार राज ठाकरे यांना वाघ म्हणतात हे सुद्धा काही कमी नाही, वडेट्टीवार लवकरच आमच्याकडे येतील असं भाकीत शिरसाटांनी यावेळी केलं आहे.
मिशन 45 पूर्ण होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही निश्चय केलाय. राज्यात 45 जागा जिंकण्याची तयारी करताना काही कमी जागा येतील का? अशी सुरूवातीला भीती होती. मात्र, राज ठाकरे सोबत आल्याने आता आम्ही 45 पुढे जाऊ असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे राज्यात सभा घेतील. संभाजी नगरात सुद्धा सभा होईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. त्याचबरोबर काही जागांवर अद्याप बोलणी सुरू असली तरी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत वगैरे काही नाही. थेट जागा वाटप आणि थेट लढती होत आहेत. सगळे एकमेकांचे प्रचार करतील असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. 2019 निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी विरोध केल्याबाबत विरोधक टीका करत आहेत. मात्र, 2019 ला कोण काय म्हटलं होतं? संजय राऊत कुठं झुकत होते? सगळं सगळ्यांनी पाहिलं आहे. राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा म्हणजे उमेदवारांना पाठिंबा आहे. त्यामुळं त्यावेळी कोण काय बोललं हे सोडून द्या असं देखील शिरसाट म्हणाले आहेत.
संभाजीनगर मधला उमेदवार उद्या : औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार उद्या जाहीर होईल असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आज निर्णय जाहीर होणार नाही. आमच्या संभाव्य उमेदवाराला काही जण नावं ठेवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाची घोषणा करतील. भाजपाला जागा सोडण्याबाबत त्यांनी मागणी केली. मात्र, पारंपरिक जागा आमची आहे. एकदा उमेदवार जाहीर झाला की भाजपा आमच्या उमेदवाराचा प्रचार करेल असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.
उद्या मातोश्रीवर बैठक : काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद शिवालय येथे झाली. त्यामध्ये संजय राऊत सगळ्यांच्या पुढे-पुढे करत होते अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. त्यात उबाठा गटातील लोक आम्हाला चायनीच माल म्हणाले या शब्दाची कीव येते. आम्ही शिवसेनाप्रमुखांसोबत आयुष्य घातलं आणि आम्हाला म्हणतात चायनीज माल. या गोष्टीचं दुःख वाटलं. पक्ष कार्यालयात त्यांच्यासोबत पत्रकार परिषद हे घेतात. उद्या मातोश्रीवर घेतील. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे पाहून शिवसेना प्रमुखांना काय वेदना होत असतील असंही शिरसाट यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा :