मुंबई Mumbai Local Mega Block : मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांच्या दर्शनासाठी मुंबई शहरासह उपनगरातून मोठ्या प्रमाणात भाविक लालबाग, परळ, चिंचपोकळी या भागात येत असतात. कोकणात गणपतीसाठी गेलेले चाकरमानी सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर पुन्हा मुंबईत येतात आणि सहकुटुंब सहपरिवार मुंबईतील या प्रसिद्ध गणपतींना भेटी देतात. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मध्य रेल्वेनं 15, 16 आणि 17 सप्टेंबर असे तीन दिवस रात्र काळात 22 लोकल फेऱ्या चालवण्याचं जाहीर केलं आहे. मात्र, या निर्णयानंतर देखील मध्य रेल्वेनं आज हार्बर मार्गासह विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनच्या कामासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
कोणत्या मार्गावर होणार ब्लॉक? : याबाबत मध्य रेल्वेनं दिलेल्या अधिक माहिती अशी की, आज विविध देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं सांगितलं. सकाळी आठ ते दुपारी साडेबारापर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात येणाऱ्या गाड्या विद्याविहार इथं अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. त्यामुळं या ब्लॉक काळात मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील उपनगरीय वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरु राहील अशी माहिती देखील मध्य रेल्वेनं दिली आहे.
अनेक मार्गावरील सेवा होणार प्रभावित : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी 4:10 पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी अकरा ते सायंकाळी 5 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार असल्याची माहिती देखील मध्य रेल्वेनं दिली आहे. पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी पावणे अकरा ते सायंकाळी 05: 13 मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
हेही वाचा :