अमरावती Marathi Language University : महानुभाव पंथाची काशी असणाऱ्या आणि लीळाचरित्र हा मराठी भाषेतला पहिला आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिण्यात आला त्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणाऱ्या महानुभाव पंथाची काशी अशी ओळख असणाऱ्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या उभारणीला लवकरच गती येणार आहे. 11 सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या तीन स्वतंत्र शासन निर्णयात मराठी भाषा विद्यापीठाच्या इमारतीसाठी 4.25 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. या निधीतून विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, कार्यालय, वर्ग खोल्या यांची निर्मिती केली जाणार आहे.
वसतीगृहासाठी एक कोटी 75 लाखांच अंदाजपत्रक - रिद्धपूर विकास आराखडा अंतर्गत बांधण्यात आलेल्या भक्तनिवास इमारत, थीम पार्क इमारत तसंच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या यात्री निवास बहुउद्देशीय सभागृह आणि ध्यान केंद्र या इमारतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या भक्त निवास इमारतीमध्ये मुलामुलींचे वसतीगृह निर्माण करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्यानुसार मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या भक्त निवास इमारतीमध्ये मुला-मुलींचे वसतीगृह निर्माण करण्याच्या कामास एक कोटी 75 लक्ष 35 हजार रुपये इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
कार्यालय व वर्गखोल्यांसाठी 54 लाख - मराठी भाषा विद्यापीठाच्या रिद्धपूर येथील थीम पार्क इमारतीमध्ये कार्यालय तसंच वर्ग खोल्या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 54 लाख 50 हजार इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. हे काम पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे संबंधित विभागाची व तत्सम प्राधिकरण यांची पूर्वपरवानगी घेण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली आहे.
फर्निचरसाठी 1.96 कोटी खर्च - मराठी भाषा विद्यापीठातील इमारतीसाठी फर्निचर व तत्सम वस्तू खरेदी करण्याच्या कामासाठी एक कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून सुमारे 51 प्रकारच्या वस्तू घेण्यात येणार आहेत हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषा विद्यापीठाचे कामकाज सुरू होईल.
डॉ. अविनाश आवलगावकर विद्यापीठाचे कुलगुरू - मराठी भाषा विद्यापीठ अधिनियम 2023 मधील कलम 87 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने 3 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. अविनाश आवलगावकर यांची रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. कुलगुरूंचा कालावधी हा एक वर्षासाठी किंवा कुलपतींद्वारे कुलगुरूंची नियमित नियुक्ती केली जाईपर्यंत यापैकी जो अवधी अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत राहणार असल्याचे देखील शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.