पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष हे येत्या जून महिन्यापासून सुरू होणार आहे. पुणे शहरातील विविध रस्त्यांवर वेगवेगळ्या शाळांच्या जाहिराती पाहायला मिळतात. पालक जाहिराती पाहून मुलांचं ॲडमिशन करतात. पण ज्या शाळेत मुलाचं ॲडमिशन केलं त्या शाळेला मान्यता आहे की नाही हे पालकांकडून कधीच पाहिलं जात नाही. मुलांच्या ॲडमिशन नंतर शाळाच बोगस असल्याचं समोर येतं आणि मग करायचं काय? असा प्रश्न पालकांना पडतो. यामुळं पालकांनी मुलांचं ॲडमिशन घेताना काय काळजी घ्यावी, याकडे लक्ष देण्याचं आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
माहिती घेऊनच मुलाचं ॲडमिशन करावं : "पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, कँटोन्मेंट बोर्डासह महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमधून 'आयसीएसई', 'सीबीएसई' आणि 'आयबी' तसंच राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सध्या प्रवेशाचं सत्र सुरू झालं आहे. बहुतांश अनेक शाळांतून नव्या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशासाठी जाहिरातबाजी देखील सुरू आहे. जाहिरातींच्या माध्यमातून पालकांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेनं पालकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. पालकांनी शाळांची माहिती घेऊनच मुलाचं ॲडमिशन करावं," असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
शाळांची माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर मिळणार : याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, "नवीन शैक्षणिक वर्ष हे जून महिन्यांपासून सुरू होणार असून आत्तापासूनच पालक हे मुलांचं ॲडमिशन करत असतात. मुलांचं ॲडमिशन करत असताना जाहिरातीत काय दिलं आहे, यापेक्षा त्या शाळेचा 'यू डायस नंबर' आहे का? तसंच त्या शाळेला प्रथम मान्यता तसंच स्व मान्यता आहे का? हे तपासलं पाहिजे. तसंच मुलांच्या सुरक्षिततेबाबत शाळेत योग्य सुविधा आहेत का? हे पाहावं. जर काही चुकीचं आढळल्यास तत्काळ शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी तसंच महानगरपालिका, नगरपालिका पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील शाळेला मान्यता नसल्यास तत्काळ कारवाई करावी. ज्या शाळांना मान्यता आहे, त्या शाळांची माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असून त्याची माहिती देखील पालकांनी घ्यावी."
प्रवेश घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल
- शाळेत प्रवेश घेताना शाळेला सरकारची मान्यता आहे का? याची तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी तसंच महानगरपालिका, नगरपालिका पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे खातरजमा करावी.
- शाळेला 'यू डायस नंबर' आहे का?
- प्रथम मान्यता, शाळेचे खेळाचे मैदान, स्वच्छतागृहे आहेत का,तसेच मुलांची सुरक्षितता आहे का?
- शाळांमध्ये भौतिक सुविधा आहेत का?
- शाळांमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत का?
- पालक-शिक्षक समिती स्थापन केली आहे का?
- विद्यार्थ्यांच्या वाहन व्यवस्थेत महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे का?
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का?
मुलांचं शाळेत ॲडमिशन घेताना पालकांनी सर्व या गोष्टींची माहिती जाणून घ्यावी.
हेही वाचा
- साताऱ्यात रंगलं ठरावांचं राजकारण : पाटण तालुक्यातील आबदारवाडीच्या ग्रामसभेत ईव्हीएमवर मतदानाचा ठराव
- अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 16 अफ्रिकन तस्करांना ठोकल्या बेड्या; 12 कोटींचे अमली पदार्थ जप्त
- अनधिकृत असल्याचं सांगत हमालांनी बांधलेल्या 80 वर्षे जुन्या मंदिराला मध्य रेल्वेची नोटीस, भाविकांमध्ये संताप