मुंबई Maharashtra Mlc Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडत असून या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची विकेट पडते, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवाराला जिंकून येण्यासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक असून पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतंही महत्त्वाची ठरणार आहेत. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शेकापचे जयंत पाटील, यांना मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
अजित पवार गटाला धक्का ? : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. भाजपाकडं 103 आमदार असून त्यांना अपक्ष आणि मित्र पक्ष अशा 8 आमदारांचं समर्थन आहे. त्यामुळे त्यांचं संख्याबळ 111 होते. अशात त्यांना त्यांचे सर्व 5 उमेदवार निवडून आण्यासाठी 4 मतांची गरज पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे एकूण 38 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांचे 2 अशा 9 आमदारांचं समर्थन असल्यानं त्यांचे संख्याबळ 47 होते. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं 39 आमदार आहेत. त्यांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आण्यासाठी अजून 7 मतांची गरज पडणार आहे. यामध्ये अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे या दोन उमेदवारांपैकी एकाला धक्का बसू शकतो.
सर्वात सुरक्षित जागा काँग्रेसची : महाविकास आघाडीत सर्वात सुरक्षित जागा ही काँग्रेसची आहे. काँग्रेस पक्षात सर्वात जास्त 37 आमदार असून काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 23 मतं मिळाली तरी काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतात. ही शिल्लक मतं मिलिंद नार्वेकर किंवा शेकापचे जयंत पाटील यांना मिळतील. उद्धव ठाकरे गटाकडं 15 आमदार आहेत. त्यांना अजून 8 मतांची गरज पडणार आहे. ती काँग्रेसकडून मिळू शकतात. शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना शरद पवार गटानं पाठिंबा दिला आहे. शरद पवार गटाकडं 13 आमदार आहेत असून शेकापचा 1 असे 14 आमदार होतात. अशात जयंत पाटील यांना विजयासाठी अजून 9 मतांची गरज पडणार आहे. जयंत पाटील यांचे सर्व पक्षांशी असलेले जवळचे राजकीय संबंध त्यांना कामी पडू शकतात.
प्रज्ञा सातव यांना अंतर्गत विरोध : काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नव्हता, असा आरोप आष्टीकर यांनी केला. परंतु काँग्रेसकडून पुन्हा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली गेल्यानं अनेकजण नाराज आहेत. असं असलं तरी काँग्रेसकडं असलेली 37 मतं बघता विजयासाठी 23 मतांची गरज असताना प्रज्ञा सातव यांचा विजय पक्का मानला जातो. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आताच्या घडीला काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटिंग शक्य दिसत नाही.
भाजपा उमेदवार :
- पंकजा मुंडे
- योगेश टिळेकर
- सदाभाऊ खोत
- परिणय फूके
- अमित गोरखे
शिवसेना
- भावना गवळी
- कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) :
- राजेश विटेकर
- शिवाजीराव गर्जे
उद्धव ठाकरे गट :
- मिलिंद नार्वेकर
काँग्रेस
- प्रज्ञा सातव
शेकाप :
- जयंत पाटील (शरद पवार गट समर्थन)
हेही वाचा :