मुंबई - विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अन् महायुतीचा शपथविधी झाल्यानंतर तीन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, शनिवारी सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतलीय. दुसरीकडे विरोधी पक्षांमधील सदस्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकत शपथ घेतली नव्हती, परंतु रविवारी विरोधी पक्षातील सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतलीय. दरम्यान, सोमवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे यात विधानसभा अध्यक्षांची एकमतानं निवड करण्यात आलीय. त्यामुळेच भाजपाचे आमदार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आलीय.
राहुल नार्वेकरांची सलग दुसऱ्यांदा निवड : राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झालीय. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यापूर्वी काँग्रेसचे त्र्यंबक भारदेंची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. 17 मार्च 1962 ते 15 मार्च 1972 यादरम्यान त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. यानंतर राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावावर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलंय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावावर आशिष शेलार यांनी अनुमोदन दिलंय. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावावर चंद्रकांत पाटलांनी अनुमोदन दिलंय. प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला असून, यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आलीय.
...म्हणून त्यांना संधी मिळाली : राहुल नार्वेकरांची एकमताने निवड झाली म्हणून त्यांचे अभिनंदन करतो, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तसेच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षानेसुद्धा परंपरेनुसार पाठिंबा दिला म्हणून त्यांचे आभार मानतो. अध्यक्ष महोदय आपण पुन्हा येईन, असे म्हटले नव्हते, पण तुम्ही पुन्हा आलात म्हणून तुमचे अभिनंदन, देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. नाना भाऊ तुमचेही विशेष आभार, कारण तुम्ही वाट मोकळी करून दिल्याने त्यांना संधी मिळालीय, असं राहुल नार्वेकरांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
हेही वाचा :