मुंबई Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी आणि रणनीती आखली जात आहे. दुसरीकडं मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. दरम्यान, निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना आता नेत्यांच्या पत्नी घराबाहेर पडत आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात, समाजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे, परंतु या नेत्यांच्या पत्नी मतदारांवर प्रभाव पाडू शकतील का? या महिलांच्या राजकारणातील सहभागामुळं काही फरक जाणवेल का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पाहूया कोण-कोणत्या नेत्यांच्या पत्नी सध्या राजकीय आणि सामाजिक व्यासपीठावर दिसत आहेत.
अमृता फडणवीस : अमृता फडणवीस या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. 2014 साली जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून अमृता फडणवीस या प्रसिद्धीझोतात आहेत. त्या स्वतः बँकेत नोकरी करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या घडामोंडीवर त्या बिनधास्त आणि उघडपणे आपलं मत मांडत असतात. तसेच विरोधी पक्षांवरही त्या टीका करताना आपण पाहिलं आहे. अमृता फडणवीस या नेहमीच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असतात. मागील निवडणूक प्रचारातसुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे आता निवडणुकीच्या वातावरणात त्या सक्रिय असल्यामुळं त्यांचा मतदारांवरती कितपत प्रभाव पडू शकेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रश्मी ठाकरे : रश्मी ठाकरे ह्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्या यापूर्वी राजकारणात किंवा समाजकारणात फार सक्रिय दिसल्या नव्हत्या. परंतु, मागील काही दिवसांपासून त्या सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर दिसत आहेत. खासकरुन शिवसेना फुटीनंतर त्या राजकीय कार्यक्रमात सहभाग घेत असल्याचं दिसत आहे. विदर्भात जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'स्त्री शक्ती संवाद' यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना महिलांशी संवाद साधला. एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “वहिनी आता बाहेर पडायची वेळ आलीय. तुम्हीसुद्धा राजकारणात सक्रिय व्हा.” यानंतर रश्मी ठाकरे ह्या अनेक कार्यक्रमात दिसल्या. रश्मी ठाकरे यांच्या नावातच ठाकरे असल्यामुळं ठाकरे नावाला वलय आहे. मात्र, रश्मी ठाकरे यांना मतदार कितपत स्वीकारतील? किंवा रश्मी ठाकरे या मतदारांचं मन परिवर्तन करण्यात यशस्वी ठरतील का? हे पाहणं ऊत्सुकतेचं ठरेल.
शर्मिला ठाकरे : शर्मिला ठाकरे या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्या आक्रमक पद्धतीनं बोलण्यात प्रसिद्ध आहेत. त्या फार काही समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय नसल्या तरी अधून-मधून त्या कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमांसमोर आलेल्या आहेत. यापूर्वी त्यांनी राज ठाकरे किंवा मनसेनं जी भूमिका घेतली ती कधीकधी न पटल्यामुळं त्याच्यावर टीकाही केली आहे. शर्मिला ठाकरे यांनी न पटणाऱ्या गोष्टींवर परखडपणे मत मांडलं आहे. परंतु, आता निवडणुकीच्या दरम्यान त्यांचा मुलगा अमित ठाकरे, पती राज ठाकरे हे सक्रिय असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्यासाठी शर्मिला ठाकरे या मैदानात उतरल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांचा नक्कीच फायदा पक्षाला आणि पती राज ठाकरे यांना होईल, असं बोललं जात आहे.
सुनेत्रा पवार : या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली जात असताना, आता बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. परंतु, सुनेत्रा पवार यापूर्वी फार काही राजकीय व्यासपीठावर दिसल्या नाहीत. मात्र आता पती अजित पवार यांना सहकार्य करण्यासाठी आणि त्यांच्या राष्ट्रवादी या नवीन पक्षाच्या वाढीसाठी, पक्षाला मदत करण्यासाठी पत्नी सुनेत्रा पवार या रणांगणात उतरल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच त्या अनेक कार्यक्रमातून राजकीय वक्तव्य करत असल्याचं दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार यांना तिकिट मिळालं तर त्यांची लढत त्यांची भावजय सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. यामुळं बारामती लोकसभा मतदार संघातून कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, निवडणुकीत सुनेत्रा पवार यांची जादू चालेल का? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आताच सांगणं कठीण : "सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणूक कशी लढवायची, प्रचार कसा करायचा यावर ऊहापोह केला जात आहे. राजकीय नेत्यांबरोबर त्यांच्या पत्नीही आपल्या पतीला पाठिंबा देण्यासाठी राजकीय व्यासपीठावर दिसत आहेत. या राजकीय नेत्यांच्या पत्नींचा थोडाफार प्रमाणात नक्कीच नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला फायदा होऊ शकतो. मात्र, मतदारांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकतील किंवा मतदारांचे मन वळवू शकतील, असं मात्र ठामपणे सांगता येणार नाही. पण, जनता ही सुज्ञ आहे, त्यांना चांगले वाईट कळते. मात्र या महिलांचा प्रभाव मतदारांवर किती पडेल, हे निवडणूक निकालानंतरच समजेल,'' असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: