अमरावती Amravati News : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात अनेक दुर्गम गावं आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत या गावांमध्ये प्यायला पाणी मिळणंही कठीण आहे. तसंच यापैकी सहा गावांमध्ये तर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. मात्र, याच मेळघाटात एक गाव असं आहे, जिथं पाण्याची थोडीही कमतरता भासत नाही. मात्र, याचं कारण काय? यासंदर्भात आपण जाणून घेऊया.
अशी आहे पाणी परिस्थिती : चारही बाजूनं उंच टेकड्यांनी वेढलेल्या मेळघाटातील पायविहीर या गावात जागोजागी जमिनीत पाणी मुरण्यासाठी टाके केलेले दिसतात. 110 कुटुंबं असलेल्या या गावात प्रत्येकाच्या घरासमोर नळाची व्यवस्था केलेली दिसते. विशेष म्हणजे सकाळी, सायंकाळी या नळाला पाणी येतं. पाण्यासाठी गावातील कुठल्याही व्यक्तीला भटकंती करावी लागत नाही. केवळ पिण्यासाठीच नव्हे तर गावालगत आदिवासी बांधवांच्या शेतात देखील मुबलक पाणी उपलब्ध असल्याचं पायविहीर या गावात गेल्यावर बघायला मिळतं.
दहा वर्षांपूर्वी पाण्यासाठी भटकंती : पायविहीर या गावात आज मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असलं, तरी दहा वर्षांपूर्वी मात्र या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. बैलगाड्यांमध्ये प्लास्टिकचे ड्रम ठेवून ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, अशा भागातून गावात पाणी आणावं लागायचं. उन्हाळ्यात तर पाण्याची भीषण टंचाई भासायची. त्यामुळं अनेकांनी गाव सोडलं, अशी माहिती पायविहीर येथील कृष्णा बेलसरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अशी बदलली परिस्थिती : एकेकाळी घनदाट जंगलानं समृद्ध असणाऱ्या पायविहीर गावालगतचं जंगल आणि जैवविविधता नष्ट व्हायला लागली. 1996 मध्ये 'खोज' या संस्थेच्या पुढाकारानं जंगल आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृतीचं काम हाती घेण्यात आलं. बऱ्याच प्रयत्नानंतर 2011 पासून पायविहीर गावाची वाटचाल इको व्हिलेज च्या दिशेनं सुरू झाली. खोज संस्थेच्या पुढाकारानं ग्रामस्थांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत 50 हजार झाडं लावली. याच योजनेतील निधी वापरुन गावात जलसंधारणाची कामं हाती घेतली गेली. जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसं मुरेल यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. चूल पेटवण्यासाठी वृक्षतोडीला आळा घालून गुरांच्या शेणाद्वारे बायोगॅस प्रणाली गावात राबविण्यात आली. त्यामुळं गावाची परिस्थिती हळू-हळू बदलायला लागली, असं बेलसरे म्हणाले.
पायविहीर गाव इंडिया बायोडायव्हर्सिटी अवार्डनं सन्मानित : 2011 मध्ये पायविहीर या गावात बदल होण्यास सुरुवात झाली. टेकड्यांवर अडवलेल्या पाण्यामुळं भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. चराईबंदी केल्यामुळं गावाजवळ दाट गवत उगवले. गावातील वनसंवर्धनाच्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या वतीनं 2013-14 मध्ये इंडिया बायोडायव्हर्सिटी अवार्ड पायविहीर या गावाला देण्यात आलं. पोर्ट ब्लेअर येथे 22 मे 2014 रोजी एका विशेष सोहळ्यात पायविहीर ग्रामसभेचे श्रीराम दहिकर आणि रामलाल काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर नल' योजना आणली. आमच्या गावात मात्र 2013-14 मध्येच प्रत्येक घरासमोर नळ आले असल्याचंही यावेळी बेलसरे यांनी सांगितलं.
हेही वाचा -