पुणे Pooja Khedkar News : ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दावा केला जातोय. यावरुनच आता दिव्यांग नागरिकांनी दिव्यांग कल्याण आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांकडं निवेदन दिले. खेडकर यांनी जर दिव्यांग असल्याचं खोट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असेल तर त्यांच्यावर आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली.
दिव्यांग असल्याच्या पुराव्यांची चौकशी व्हावी : शनिवारी (13 जुलै) पुण्यातील काही दिव्यांग नागरिकांनी एकत्र येत राज्य दिव्यांग आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांची भेट घेतली. यावेळी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग असल्याच्या पुराव्यांची चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणा द्यावे, अशी मागणी दिव्यांग नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.
पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील निवेदन आम्हाला मिळालं आम्ही याची सखोल चौकशी करणार आहोत- डॉ. प्रवीण पुरी, राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त
खोटी प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाई व्हावी : यावेळी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना रफीक खान म्हणाले, "दिव्यांगांचा संघर्ष जन्मापासूनच सुरू होतो. तो आपलं शिक्षण कसं पूर्ण करतो, हे त्याचं त्यालाच माहित असतं. त्यानंतर नोकरीसाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, असा प्रकार घडल्यामुळं खरा दिव्यांग आपल्या हक्कापासून वंचित राहतोय. याचे परिणाम त्याचा कुटुंबालादेखील भोगावे लागतात. त्यामुळं पूजा खेडकर प्रकरणात चौकशी समिती गठीत करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पूजा खेडकरवर होणारे आरोप सिद्ध झाल्यास संबंधित डॉक्टर आणि संबंधित यंत्रणांवर गुन्हा दाखल करावा. तसंच अशा प्रकारची दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून अजून किती लोक आहेत ज्यांनी शासकीय सेवेत नोकरी मिळवलीय, याची देखील चौकशी करण्यात यावी." दिव्यांग कल्याण आयुक्तांनी चौकशी केली तर त्यामधून आणखी कोणी अधिकारी सापडणार का? पोलीस आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे देणाऱ्यांवर कारवाई होणार का? याबाबतचे प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहेत. नेमकी काय कारवाई होईल, हे येत्या काही दिवसांमध्ये समजणार आहे.
हेही वाचा -
- पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन; जिल्हा शल्य चिकित्सकांनी केला मोठा खुलासा - IAS Pooja Khedkar
- शेतकऱ्याला धमकी देणं भोवलं; आयएएस पूजा खेडकर यांच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल - IAS Pooja Khedkar
- IAS पूजा खेडकर यांच्यावरील आरोपानंतर विद्यार्थ्यांचा संताप; संसदेत चर्चा करण्याची मागणी - IAS Pooja Khedkar