मुंबई Holi Celebration : होळी सणाला रंगांचा सण म्हणून ओळखलं जातं. तसंच या सणाला 'होळी पौर्णिमा' असंही म्हटलं जातं. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड आणि रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. आज (25 मार्च) सर्वत्र रंगांची उधळण करत धुळवड साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतही ठिकठिकाणी धुळवडीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
राजकीय नेत्याकडून कार्यक्रमांचं आयोजन : निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मुंबई उपनगरात भाजपा नेते राजहंस सिंह यांनी धुळवडीच्या निमित्तानं विशेष संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात रंगांची उधळण करण्याबरोबर होळीच्या खास गाण्यांवर त्यांनी स्वतः ठेका धरला. "गिले शिकवे भूलकर दोस्तो, दुश्मन भी गले मिल जाते है" या गाण्याच्या ओळीप्रमाणे विविध राजकीय पक्ष या निमित्तानं धुळवडीचा आनंद लुटताना दिसून आले. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी देखील मुंबईतील जुहू परिसरात आज संगीतमय कार्यक्रमांचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला भाजपा नेत्यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावत रंगांची उधळण केली. निवडणुकीच्या तोंडावर या आयोजनाच्या माध्यमातून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असून, त्याला तरुणाईकडूनही मोठा प्रतिसाद मिळतोय.
संजय निरुपम यांनीही लुटला आनंद : लोकसभा उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी न दिल्या कारणानं पक्षावर नाराज असलेले काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनीही त्यांच्या सोसायटीमध्ये धुळवडीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये संजय निरुपम यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह धुळवडीचा आनंद लुटला.
हेही वाचा -
- कोकणची अनोखी होळी; आमदार भास्कर जाधवांनी लुटला पालखी नाचवण्याचा आनंद - Holi Festival 2024
- होळी पार्टीचा आनंद लुटण्यासाठी ही टॉप 5 गाणी प्ले तुमच्या लिस्टमध्ये नक्की सामील करा - Top 5 Holi Song
- शेकडो वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील पारंपरिक राजवाडी होळी; सर्व पक्षीय नेत्यांनी घेतला आनंद - Rajwadi Holi Nandurbar