मिरारोडमध्ये तणावपूर्व शांतता; दोन गटातील वादानंतर तगडा बंदोबस्त, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन - नया नगर
Mira Road Dispute : मिरारोड इथं दोन गटात राडा झाल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सध्या मिरारोड परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
Published : Jan 23, 2024, 7:37 AM IST
ठाणे Mira Road Dispute : अयोध्या इथं प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापणा होण्याच्या पूर्वसंध्येला मिरारोड परिसरात दोन गटात वाद झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत 4 तरुण गंभीर जखमी तर 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी मिरारोड परिसरातील सर्व आस्थापना, दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मिरा रोड परिसरातील अनेक मार्गांवर नाकाबंदी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नया नगर पोलीस ठाण्यात याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
नागरिकांनी शहरात शांतता राखणं गरजेचं आहे. झालेल्या प्रकारानं तणाव आहे, मात्र सगळ्यांनी शांतता राखायला हवी. ज्यांनी कृत्य केलं, त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल. पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत. त्यामुळं कोणत्याही निष्पाप नागरिकांवर कारवाई करण्यात येणार नाही. मात्र जे काही तरुण सहभागी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. - श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त
नया नगर परिसरात राडा : नया नगर परिसरातील नीलम पार्क या चौकात दोन ते तीन चारचाकी वाहन घेऊन दुचाकीधारक तरुण नारे लावत जात होते. यावेळी दुसऱ्या गटातील काही तरुणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानं राडा झाला. यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तरुणांनी नारे लावणाऱ्या तरुणांनांचा पाठलाग करत बेदम मारहाण करण्यात आली. सोमवारी सायंकाळी नया नगरच्या मागच्या रेल्वे लगत रोडवर किरकोळ दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती हाताळली आणि मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी घेतलं काही तरुणांना ताब्यात : नया नगर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं नया नगर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणांनी एकच गोंधळ घातला. स्थानिक माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी या जमलेल्या नागरिकांना आवाहन केलं. यावेळी त्यांनी "कोणत्याही प्रकारे निष्पाप लोकांवर कारवाई होणार नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले जात आहेत. तथ्य आढळेल, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल," असं मुजफ्फर हुसेन यांनी सांगितलं. त्यानंतर नयानगर बाहेर असलेल्या नागरिकांची गर्दी कमी झाली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून सध्या अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आलं आहे. नया नगर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, हजारो पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून शांततेचं आवाहन : रविवारी झालेल्या वादाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर दिसून येऊ लागले आहेत. रविवारी मध्यरात्री अनेक तरुण भाईंदर पश्चिम इथल्या रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान "रविवारी किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन तो आता निवळला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वातावरण शांत ठेवावं," असं आवाहन नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी केलं आहे.