मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागलेत. अशातच मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, मागील दोन-अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेत. महायुतीचं सरकार राज्यात आल्यानंतर टाटा एअरबस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्याच प्रोजेक्टचे आज (सोमवारी) गुजरातमध्ये मोदी-शाह यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या प्रोजेक्टमुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार होता. पण तरुणांचं भवितव्य अंधारात नेण्याचे काम महायुती सरकारनं केलंय. महायुती सरकारमधील नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मोदी-शाहांच्या आदेशानुसार वागतात आणि काम करीत आहेत. तसेच ते गुजरातसाठीसुद्धा काम करताहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी महायुती सरकारवर केलाय. दरम्यान, यावेळी महायुती सरकारच्या काळात अनेक उद्योगधंदे गेल्यामुळं तरुण कसे बेकार झालेत, यावर आधारित एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. या जाहिरातीतून महायुती सरकारवर टीकस्त्र डागण्यात आलंय.
आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था केंद्र कुठे गेलं?: पुढे बोलताना सावंत म्हणाले की, महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या महायुती सरकारनं केलंय. राज्यातील अनेक प्रोजेक्ट आणि उद्योगधंदे यातून लाखो रोजगारनिर्मिती होणार होती. तसेच लाखो रुपयांची गुंतवणूक होणार होती, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असती. परंतु सरकारची उदासीनता आणि मोदी-शाहांचे लाडके राज्य गुजरात यांच्यासाठी त्यांनी राज्यातील सगळे प्रोजेक्ट गुजरातला पाठवले. दरम्यान, आज टाटा एअरबसचे उद्घाटन होत असताना मोदी-शाह आणि महायुतीतील नेते हे राज्याच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी मोदी-शाह आणि राज्यातील महायुती सरकारमधील नेत्यांवर केलीय. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं की, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था केंद्र हे देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे आणण्यात येईल. याला देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनीही दुजोरा देताना नक्कीच मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र येईल, असं म्हटलं होतं. मात्र आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था केंद्र न आणता तेही गुजरातला पाठवलंय. त्यामुळं कुठे आहे वित्तीय संस्था केंद्र? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय. भाजपा पक्ष हा खोटं बोलण्याचा कारखाना आहे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे त्याचे म्होरके असल्याची टीका सावंत यांनी यावेळी केलीय.
...म्हणून माघार घेतली: विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे नेते उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे खेटा घालत असताना आपणाला अंधेरी पश्चिममधून जी उमेदवारी मिळाली होती, त्यातून तुम्ही माघार का घेतली? असा प्रश्न सावंत यांना विचारला असता, बघा मला ज्या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती, त्या ठिकाणी महाविकास आघाडीमधील अन्य पक्षाचे काम आहे. माझे तिथे काही काम नसताना केवळ कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेत मी उमेदवारीतून माघार घेतली, असं सावंत म्हणाले. पण याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मी आभार मानतो की, त्यांनी मला त्यासाठी पात्र समजून उमेदवारी जाहीर केली होती. त्यांचे मी धन्यवाद देतो. पण जरी मला पक्षाने दुसरी जबाबदारी दिली तरी तीसुद्धा स्वीकारण्यास मी तयार असल्याचेही सावंत यावेळी सांगितले.
हेही वाचा :