कोल्हापूर Narendra Modi visit to Poland : 1942 च्या दुसऱ्या महायुद्धात हिटलरनं पोलंडवासीयांचा अमानुष नरसंहार सुरू केल्यानंतर भारतातील दोन संस्थानांनी पोलंडवासियांना आश्रय दिला होता. त्यामध्ये कोल्हापूर संस्थान आणि जामनगर संस्थानच्या संस्थानचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या पोलंडमधील दौऱ्यात कोल्हापूर संस्थाननं पोलंडवासियांना केलेल्या मदतीला पुन्हा उजाळा मिळाला आहे.
45 वर्षांनंतर प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी पोलंडचा दौरा केला. त्यामुळं पंतप्रधान मोदींचं पोलंड सरकारकडून जंगी स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवानगर येथील जाम साहेब स्मारक येथे आदरांजली वाहिली. याबाबतचे फोटो त्यांनी सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या 'एक्स हँडल'वर म्हटलं की, "मानवता आणि करुणा हे न्याय्य तसेच जगातील शांततेचा महत्त्वाचा पाया आहेत. वॉर्सामधील नवानगर येथील जाम साहेब स्मारक हे जाम साहेब दिग्विजय सिंहजी, रणजीत सिंहजी जडेजा यांच्या मानवतावादी योगदानावर प्रकाश टाकते. युद्धकाळात त्यांनी पोलंडमधील निराधार मुलांना आश्रय देत काळजी घेतली."
वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकावर श्रद्धांजली अर्पण : दुसऱ्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले की, "वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याचे स्मारक आहे. कोल्हापूरच्या महान राजघराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित आहे. या राजघराण्यानं मानवतेला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले. हे राजघराणे दुसऱया महायुद्धातील स्थलांतरित झालेल्या पोलंडच्या महिलांना आणि मुलांना आश्रय देण्यात आघाडीवर होते. त्यांनी पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाचे जीवन सुनिश्चित केले. त्यांच्या करुणेच्या कृपेमुळं येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहिल".
करवीर संस्थानानं दिला पोलंडवासियांना आश्रय : दुसऱ्या महायुद्धात हिटलरनं पोलंडमधील नागरिकांचा छळ सुरू केला. तेव्हा जीवाच्या भीतीनं पोलंडवासीय हे देश सोडून बाहेर पळाले. भारतात आलेल्या पोलंडच्या नागरिकांना तेव्हा जामनगर आणि करवीर संस्थाननं आश्रय दिला होता. छत्रपती राजाराम महाराजांनी सुमारे 2000 पोलंडच्या नागरिकांना आश्रय दिला. त्यांच्यासाठी कोल्हापुरातील वळीवडे येथे खास वसाहत निर्माण केली. पोलंडचे स्थलांतरित सुमारे पाच वर्षे कोल्हापुरात वास्तव्यास होते. त्यांचं कोल्हापूरशी असलेलं नातं आजही कायम आहे. युद्धकाळात कोल्हापुरात स्थायिक झालेल्या पोलंडच्या निर्वासितांनी कोल्हापूरच्या राजघराण्याला श्रद्धांजली म्हणून आपल्या जन्मभूमीत स्मारक उभारलं आहे. पोलंड दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाला अभिवादन करून सातासमुद्रापार जपलेल्या या घनिष्ठ मैत्रीच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा दिला.
वळीवडे गावात स्वतंत्र वसाहत : 1939 ते 1945 या काळात जगानं दुसरं महायुद्ध पाहिलं. या युद्धामध्ये पोलंडच्या अनेक नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं. त्यातील अनेक जणांनी भारतात आश्रय घेतला. त्याच वेळी कोल्हापूरच्या गादीवर असलेले राजाराम महाराज छत्रपती यांनी त्यांना आश्रय दिला. वळीवडे गावात या त्यांच्यासाठी स्वतंत्र वसाहत निर्माण करण्यात आली होती. त्यांनी पाच वर्षे आश्रय दिला होता. मायदेशी निघालेल्या पोलंडवासियांच्या पावलांचे ठसे आजही या गावात पाहायला मिळतात. या नागरिकांनी कोल्हापूर शहराशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळेच कोल्हापुरातील जुन्या संगम चित्र मंदिराजवळ या काळात मृत्युमुखी पडलेल्या अनेक पोलंडवासियांच्या स्मृती आहेत. दोन्ही देशांमधील मैत्रीची आठवण म्हणून महावीर उद्यानात स्मृतीस्तंभ उभारण्यात आला आहे.
नावावरून पडलं 'पापाच्या तिकटी' नाव : 1942 पासून पाच वर्ष कोल्हापुरात स्थायिक असलेल्या पोलंड नागरिकांपैकी पापा परदेशी यांचा मद्य विक्रीचा व्यवसाय होता. मद्य विकणं म्हणजे पाप असे पोलंडमध्ये मानलं जातं. ज्या परिसरात परदेशी यांचं दुकान होतं, तोच परिसर सध्या कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत आहे. पापा परदेशी यांच्या नावावरूनच या परिसराला 'पापाची तिकटी' असं नाव पडल्याचं कोल्हापूर शहराचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद यांनी सांगितलं.