चंद्रपूर Ganeshotsav 2024 : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे बाप्पा साकारण्यात आले आहेत. कुठे वेगळ्या प्रकारची सजावट, देखावे तर कुठे बाप्पाची वेगळ्या स्वरुपातील मूर्तीची (Ganapati Idol) स्थापना करण्यात आली आहे. सध्या बाप्पाची अशीच एक मूर्ती आकर्षणाची केंद्र ठरत असून ही मूर्ती तब्बल 50 हजार 1 बटनांनी साकारली आहे. चंद्रपूर शहरातील हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने ही मूर्ती साकारली आहे. यंदा या मंडळाचं पहिलंच वर्ष आहे.
अशी सुचली कल्पना : गणेशोत्सवात प्रत्येक मंडळाची वेगवेगळी संकल्पना असते. बाप्पासाठी काही वेगळी संकल्पना करावी यासाठी, तुकूम परिसरातील राऊत लेआऊट येथील काही तरुण एकत्र येत त्यांनी गणेश मंडळाची स्थापना केली. यामध्ये अध्यक्ष मयूर भोकरे, उपाध्यक्ष प्रांजल परसुटकर, कोषाध्यक्ष कुणाल वानखेडे, सचिव प्रफुल ठोंबरे, सहसचिव अमित येरगुडे, मार्गदर्शक गजानन पिदूरकर, निलेश गुजरकर, निकेश पिदूरकर यांचा समावेश आहे. या सर्वांच्या चर्चेदरम्यान गणेशाची मूर्ती ही वेशभूषा आणि कपड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या बटनांपासून साकारण्याची कल्पना सुचली. 50 हजार 1 बटनांचा वापर करण्याची कल्पना समोर आली आणि यावर सर्वांचं एकमत झालं.
ग्राफिक्स तंत्रज्ञानाचा केला उपयोग : 50 हजार 1 बटनांचा उपयोग करायचा मात्र, ही मूर्ती दिसायला आकर्षक दिसणेही अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यानुसार बाप्पाच्या मूर्तीवर कोणकोणत्या रंगाचा वापर असावा हे देखील ठरवणं आवश्यक होतं. यासाठी ग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. कम्प्युटरमध्ये बाप्पाची प्रतिमा तयार करून त्यावर कोणता रंग वापरता येईल हे निश्चित करण्यात आलं.
8 फुटाची मूर्ती साकारली : 50 हजार 1 बटनांनी बाप्पाच्या मूर्तीची सजावट करण्याचं ठरलं. त्यानुसार आवश्यक आकाराच्या मूर्तीची ऑर्डर देण्यात आली. तुकूम येथील निखिल पेंटर या कलाकाराने यासाठी 8 फुटांची मूर्ती साकारली. मात्र, त्यावेळी ही मूर्ती साध्या स्वरूपात होती.
13 दिवसांचे अविरत काम : बाप्पाची मूर्ती मंडळात आणण्यात आली आणि खऱ्या आव्हानाचं काम सुरू झालं. मोठ्या आकारापासून छोट्या आकाराची बटने अत्यंत योग्यपध्दतीने चिटकवायची होती. 22 ऑगस्टला ही मूर्ती मंडळात आणण्यात आली आणि तब्बल 13 दिवस याचं अविरतपणे काम सुरू होतं. 5 सप्टेंबरला संपूर्ण मूर्ती साकारण्यात आली. यासाठी सहा वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बटनांचा वापर करण्यात आल्याची माहिती हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाचे अध्यक्ष मयूर भोकरे यांनी दिली.
हेहा वाचा -