छत्रपती संभाजीनगर FIR Against Jitendra Avhad : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजी नगरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारची बदनामी केल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय काळुंखे या तरुणानं तक्रार दाखल केली. आपल्या फायद्यासाठी चुकीची अफवा पसरवत सरकारची बदनामी केल्याचा आरोप विजय काळुंखे या तरुणानं आपल्या तक्रारीत केला.
सरकारला बदनाम करण्याचा आखला डाव : विजय काळुंखे या युवा व्यावसायिकानं गुरुवारी शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. आव्हाड यांनी त्यांच्या समाज माध्यमावर सरकार विरोधी वक्तव्य केलं होतं. लाडकी बहीण योजनेत महिलांना दीड हजार रुपये देताना आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणारे एक लाख रुपये वळवले, असा आरोप केला. मात्र ही माहिती चुकीची असल्याचं विजय काळुंखे यांना वाटलं. त्यांनी याबाबत माहिती घेतली असता, शेतकऱ्यांना मदत देण्याचे सरकारी निर्देश असल्याचं समोर आलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सरकारला बदनाम करण्याचा डाव आखला आहे. लोकांसमोर खोटी माहिती देऊन दिशाभूल केलं जात असल्यानं आपण पोलिसात तक्रार दिल्याचं तक्रारदार युवक विजय काळुंखे यानं सांगितले. "जितेंद्र आव्हाड यांच्यावर 353/2 या कलमाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
उत्कृष्ट बालिशपटू पुरस्कार द्यावा :"आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं अनुदान बंद केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. त्यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू असा पुरस्कार देण्यात आला. मात्र ते अशा पद्धतीनं वक्तव्य करत असतील, तर राज्यात स्वयंघोषित असलेले जानते राजे यांनी स्वतःच एक सोहळा आयोजित करून जितेंद्र आव्हाड यांना बालिशपणा हा आगळावेगळा पुरस्कार द्यावा. म्हणजे त्यांच्या वक्तव्यांचं समर्थन करता येईल, अशी मागणी देखील तक्रारदार विजय काळुंखे यांनी केली.
हेही वाचा :
- जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी धनंजय जाधव यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमका हल्ला कसा झाला? - Jitendra Awhad Car Attack
- गाडीवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, "मी मेलो तरी..." - Jitendra Awhad Car Attack
- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News