छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Road Issue : देशाची झपाट्यानं प्रगती होत आहे, त्यात दोन जिल्ह्यांना जोडणारे रस्ते मोठे आणि मजबूत होत असल्यानं प्रवास सुखकर होत असल्याचा दावा नेहमीच केला जातो. मात्र, आधुनिक युगात आजही ग्रामीण भागातील रस्ते तयार होण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागते. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं मृतदेह चक्क बैलगाडीवरून नेण्याची वेळ एका कुटुंबीयांवर आली. गल्लेबोरगावमधील अंधार मळा येथे ही धक्कादायक घटना घडली.
मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर : गल्लेबोरगाव गावाजवळ असलेल्या अंधार मळा परिसरात 25 ते 30 शेतकरी राहतात. या परिसरातील तत्कालीन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी कच्चा रस्ता तयार करून दिला होता. मात्र, हा कच्चा रस्ता असल्यानं पावसाळ्यात पाणी साचून रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळं या भागातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडली तर त्याला या रस्त्यावरून नेणं कठीण होतं. अंधार मळा परिसरात राहणाऱ्या ठकडाबाई रखमाजी शेवारे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. अंधार मळा ते गल्लेबोरगाव हा कच्चा रस्ता अडीच किलोमीटरचा असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता जलमय व चिखलमय झाला. त्यामुळं ठकडाबाई यांचा मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला. रस्ता नसल्यानं चिखलातून मार्ग काढण्यासाठी लोकांना बैलगाड्यांवर अवलंबून राहावं लागतं आहे.
रस्ता चांगला करण्याची मागणी : रस्त्याअभावी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बैलगाडीतून न्यावा लागला. या घटनेनं प्रशासनाला आता तरी जाग येणार का? लोकप्रतिनिधी या रस्त्याचं मजबुतीकरण करून डांबरीकरण करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. अंधार मळा ते गल्लेबोरगाव रस्त्याचं मजबुतीकरण व डांबरीकरण करावं, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
हेही वाचा