मुंबई Nana Patole News: लोकसभा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकीकडं शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू असताना जनता दुष्काळानं होरपळली. राज्यातील सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढावे, अशी मागणी करत काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टममंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ आणि राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शोभा बच्छाव, वसंतराव चव्हाण, बळवंत वानखेडे, मोहन हंबर्डे, वजाहत मिर्झा आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती आणि मंत्री परदेशात: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, " महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असतानादेखील सरकारमधील मंत्री सुट्टीवर गेले होते. तर काही मंत्री परदेशात गेले होते. परदेशात जाण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणे गरजेचे आहे. मंत्र्यांनी केंद्र सरकारची परवानगी घेतली होती का? याचा खुलासा करावा," असं नाना पाटोले यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी- "शेतकऱ्यांना पुरवली जाणारी खत आणि बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीत. याबाबत टेंडरदेखील काढण्यात आलं नाही. याला विरोध केला तर कृषी आयुक्तांना हटवण्यात आलं. सरकारनं राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत." संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरू आहे," असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यांनी केला. खरीपाच्या पेरणीसाठी खतं आणि बियाणं सरकारनं पुरवावे, अशी विविध मागण्या काँग्रेसकडून राज्यपालांकडं करण्यात आल्या आहेत.
बिल्डरकरिता सरकारने केले गरिबांना बेघर: पवईमधील भीमनगर झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या नियमबाह्य कारवाईचा मुद्दाही मांडण्यात आला. नाना पटोले म्हणाले, "हिरानंदानी या बिल्डरसाठी सरकारनं गरिबांना बेघर केलं आहे. सरकार, प्रशासन आणि बिल्डराच्या संगनमतानं ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पावसाळ्यात अशा प्रकारची कारवाई करू नये," असे निर्देश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
अधिकाऱ्याला निलंबित करा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान म्हणाले की, "भीमनगर येथे तीन पिढ्यांपासून राहत असलेल्या कुटुंबांना सहा जून रोजी पोलिसांनी घरात घुसून मारहाण करत बाहेर काढलं. महिला, वरिष्ठ नागरिक, लहान मुलं यांनाही मारहाण करण्यात आली. या कारवाईत 650 कुटुंबांना बेघर करण्यात आलं आहे. या कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांना भरपाई देण्यात यावी. नियमबाह्य कारवाई केल्यानं मुजोर मनपा अधिकारी पोलीस आणि बिल्डरवर एससी, एसटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून निलंबित करावं. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी," अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा