मुंबई Nashik Mumbai Ahmedabad Highway : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी ‘रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अशातच नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडीसी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रस्ते दुरूस्तीच्या कामात हयगय करू नका, तसंच गर्दीच्या वेळी अवजड वाहतुकीचे नियमन करा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
गणेशोत्सवा निमित्त वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी बैठकीत मुख्यमंत्र्यांसह विविध संबंधित विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. नाशिक- भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाल्यानं वाहतुकीसाठी अडचणी होत असून पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळं वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची मुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली. रस्ता दुरुस्तीचं काम तातडीनं पूर्ण करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीनं करावं, असही त्यांनी सागिंतलं
दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे : नागरिकांना वाहतूक कोंडीमुळं होणाऱ्या त्रासातून तत्काळ सुटका व्हावी यासाठी तातडीनं खड्डे बुजवावेत. ‘रॅपीड क्वीक सेटींग हार्डनर, एम सिक्टी’ या टेक्निकच्या माध्यमातून तात्काळ खड्डे बुजवावेत, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो, तेथे प्रीकास्ट पॅनलचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनानं त्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी. यंत्रणांनी परस्परांच्या समन्वयातून काम करावेत. दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तर ठाणे नाशिक महामार्ग दुरूस्तीच्या कामाची उद्या पाहणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अवजड वाहनांच्या पार्कींगसाठी नाशिक महामार्गावर सोनाळे, पडघा, आसनगाव याठिकाणी पार्कींग लॉट तयार करण्यात यावा. सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत अवजड वाहतुक बंद करण्याबाबत एकत्रित अधिसूचना कोकण विभागीय आयुक्तांनी काढावी असंही, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं.
हेही वाचा