अहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमधील एका विवाह सोहळ्याला हजेरी लावली. 2016 च्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पीडितेच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत त्यावेळी दिलेलं आश्वासन पाळलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आश्वासन : कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना फडणवीस यांनी त्यावेळी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आपली असेल आणि लग्नालाही उपस्थित राहीन, असं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांनंतर समारंभाला उपस्थित राहून दिलेलं आश्वासन पाळलं आहे. 2016 मध्ये झालेल्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणानं राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली होती.
काय आहे कोपर्डी प्रकरण? : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे जुलै 2016 च्या संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आंदोलन पेटलं होतं. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा समाजानं राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता. तर दोषी तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबानं केली होती. अखेर त्या तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती.
फाशीची शिक्षा सुनावली होती : कोपर्डी येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली होती. तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष मवाळ या तिघांनी जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शालेय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.
हेही वाचा -
- Kopardi Rape Case : आरोपीचा मृतदेह कोपर्डीत आणण्यास गावकऱ्यांचा विरोध; पुण्यात केले अंत्यसंस्कार
- Kopardi Rape Case: कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहात आत्महत्या; आरोपी मानसिक रुग्ण असल्याची प्रशासनाची माहिती
- कोपर्डीत मागासवर्गीय तरुणाची आत्महत्या; विवस्त्र करून मारहाणीनंतर उचललं टोकाचं पाऊल - Kopardi Crime