नागपूर Chandrasekhar Bawankule : नुकत्याचं झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला ०.३ टक्के कमी मतं मिळाली आहेत. त्याची कारणं काय आहेत, कुठे आणि का कमी पडलो यावर कालच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज (19 जून) नागपूर येथे बोलत होते. आम्ही जिथे कमी पडलो तिथं अधिकचे काम करून भविष्यात कमी पडू नये यासाठी आम्ही काम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
भाजपा काढणार आभार यात्रा : मतदारांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. ज्यांनी आम्हाला मतं दिली, ज्यांनी मतं नाही दिली त्यांचेही आभार मानणार आहे. जुलै महिन्यात ही यात्रा काढली जाणार आहे. जिल्हा स्तरावर यात्रा सुरू करून आभार यात्रेचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मोदींवरील टीकेची नोंद जनतेनं घेतली : निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या संदर्भात एखादा शब्द बोलला तर त्यावर राजकारण सुरू होते. तुम्ही मागील अनेक वर्षांत मोदींवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करता याची नोंद जनतेनं घेतली असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. शरद पवार यांनी याचं आकलन केलं पाहिजे. एखादा शब्द पंतप्रधान मोदी बोलले तर तुम्हाला एवढा का लागला, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केलाय.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी कायम : लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठं अपयश मिळालं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पदमुक्त करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्य केली आहे असं आम्ही समजतो. केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा आमची विनंती मान्य केली असं आम्ही समजतो असं ते म्हणाले आहेत. महायुती सरकार लोकांच्या हितासाठी काम करेल. यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणं आवश्यक आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांबद्दल मी असं म्हणेल सर्वांनी चांगलं काम करायचं आहे.
अजित पवारांनी वेगळा विचार करण्याची गरज नाही : महायुतीमध्ये अजित पवार यांना टार्गेट केलं तर आम्ही वेगळा विचार करू, असे सूर राष्ट्रवादीत उमटत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले अजित पवारांबद्दल आमच्याकडून तर कुणीही बोलत नाही. ज्यांनी कोणी बोललं असेल त्यांना लखलाभ. वेगळा विचार करण्याची गरज नाही. तर छगन भुजबळ यांना विचारावा लागेल त्यांची नाराजी काय आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणं हे योग्य नाही.
ओबीसीवर अन्याय होणार नाही, काळजी घेतली पाहिजे : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे ही भूमिका आमची आहे.
नाना पटोले यांनी आत्मपरीक्षण करावं : नाना पटोले इतक्या खालच्या पातळीवर गेलेले आहेत की, शेतकऱ्याला स्वतःचे पाय धुवायला लावत आहेत. या महाराष्ट्रात अशोभनीय प्रकार नाना पटोले यांनी केला. काँग्रेसनं इंग्रजांचा तो काळ आज आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं मत बावनकुळे यांनी मांडलं.
देवेंद्र फडणवीसचं भाजपाचे नेते : महाविकास आघाडीचे ५ भावी मुख्यमंत्री झाले आहे. पंढरपूरच्या वारीत किमान ६ नेत्यांचे बॅनर लागले आहेत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल यावर कुठली चर्चा आज नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे नेते आहेत. आज मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्याची गरज नाही. आमचे प्रभारी तिन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा :
- 'चंदू चॅम्पियन'नं कपिल देवला केलं भावूक, म्हणाले 'चित्रपट चुकवू नका' - Kartik Aaryans Chandu Champion
- राज्यात पोलीस भरती सुरू, एका पदासाठी तब्बल 101 अर्ज, पुरेशा सुविधांअभावी उमेदवारांची गैरसोय - Maharashtra Police Recruitment
- पोलीस भरतीत घोटाळा टाळण्यासाठी अमरावती पोलिसांकडून 'आरएफआयडी' तंत्राचा वापर - Police Recruitment 2024