चंद्रपूर Lloyds Metals Chandrapur : घुग्गुस शहरात उभारण्यात आलेल्या उद्योगांमुळं या शहरानं राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहराचा दर्जा गाठलाय. शहरात असलेल्या खुल्या कोळसा खाणी, उघड्यावर असलेले कोळसा डेपो, त्यातून होणारी अवजड-अवैध वाहतूक, एसीसी सिमेंट उद्योग आणि लॉयड मेटलचा पोलाद कारखाना अशा उद्योगांमुळं आधीच हे शहर कोंडलेलं आहे. असं असतानाच आता एका मोठ्या लोह प्रकल्पाचं नियोजन करण्यात येत आहे. ज्याला पर्यावरणवादी आणि स्थानिकांचा तीव्र विरोध आहे.
वार्षिक 40 लाख टन पोलाद निर्मितीचा प्रस्ताव : घुग्गुसमध्ये लॉईड मेटल्स कारखान्यात स्पॉंज आयर्न म्हणजे कच्च्या लोखंडाचा कारखाना आहे. येथे दररोज 500 मॅट्रिक टनपेक्षा जास्त पोलादाची निर्मिती होते. 2006 मध्ये या प्रकल्पाची क्षमता वार्षिक 27 हजार टन करण्यात आली. आता याच प्रकल्पाचा विस्तार करून 40 लाख टन अतिरिक्त पोलादाची निर्मिती उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे.
सात प्रकल्पांची जोड : 40 लाख टन पोलाद निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी मोठं बांधकाम करावं लागणार. यासाठी 40 लाख टन वार्षिक क्षमतेचे अतिरिक्त पॅलेट प्लांट, 8.4 लाख टन क्षमतेची ब्लास्ट फर्नेस, 4 लाख टन क्षमतेची अतिरिक्त कोक ओव्हन, 670 टन प्रति दिवस क्षमतेचा अतिरिक ऑक्सिजन प्लांट, तसंच 90 मेगावॉट पावर क्षमतेची अतिरिक्त थर्मल पॉवर, 10 लाख टन क्षमतेची रोलिंग मिल, 2.16 लाख टन क्षमतेची कोल वॉशरी आणि कोल वॉशरीला जोडून 85 मेगावॉट क्षमतेचा पावर प्लांट असे सात प्रकल्प घुग्गुस आणि लगतच्या उसेगाव या दोन गावात आणले जात आहेत. यामुळं आधीच प्रदूषित असलेल्या या परिसरात आणखी प्रदूषणाची भर पडणार आहे.
जगभरातून होतोय विरोध : लोह कारखाने मानवी वस्तीपासून दूर असावेत, असं मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केलं. "कोळशावर चालणाऱ्या स्पंज आयर्न प्रकल्पाचा जगभरात विरोध होतोय. आफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा सर्वच भागात स्पंज आयर्नच्या कारखान्यांना विरोध आहे. जगभरातील स्पंज आयर्न प्रकल्प दोन प्रकारात विभागले गेले आहेत, एक कोळसा आधारित आणि दुसरा गॅस आधारित. प्रदूषणाच्या दृष्टीनं नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प हे पर्यावरणपूरक मानले जातात, मात्र घुग्गूस येथील प्लांट कोळशावर आधारित असल्यानं प्रदूषणाची तीव्रता वाढणार," असं सुरेश चोपणे यांनी सांगितलं.
गडचिरोलीतून होणार कच्च्या मालाची वाहतूक : घुग्गुस येथील लॉयड मेटल्स कंपनीत वापरलं जाणारं कच्चं लोखंड चंद्रपूर जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागढच्या खाणीतून कच्चं लोखंड येथे आणलं जाणार. लांब अंतरावरून आयर्न ओर वाहून आणल्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील चंद्रपूर ते भामरागड, आष्टी, अहेरी, सिरोंचा या भागातील रस्ते अवजड वाहनांमुळे पूर्णपणे खचले आहेत. तसंच ज्या ठिकाणी वाहतूक होतेय त्या रस्त्याच्या शेजारील गावांमध्ये धूळ पसरत आहे. नदीतील पाण्याचा रंग लाल झालाय. त्यामुळं एका कारखान्यासाठी अनेक गावं प्रदूषित होऊ लागली आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळं अपघातात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालीय," असं ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक प्रा. योगेश दुधपचारे यांनी सांगितलं.
घुग्गुस शहर सर्वाधिक प्रदूषित का? : घुग्गुस शहरात इंग्रजाच्या काळापासून कोळसा खाणी आहेत. येथे कोळशावर आधारित अनेक उद्योग आहेत, ज्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्यातच एसीसी सिमेंट उद्योग कारखाना आणि लॉयड मेटल स्पंज आयर्न कारखान्याची भर पडलीय. चंद्रपूर शहर प्रदूषणाच्या दृष्टीनं धोकादायक पातळीवर आहे. मात्र, घुग्गुस शहराची प्रदूषणाची पातळी ही त्याच्या कित्येक पट अधिक आहे, असं पर्यावरण अभ्यासक प्रा. चोपणे यांनी सांगितलं. 2013 मध्ये घुग्गुसचा CEPI रेट 81.90 इतका प्रचंड मोठा होता. 70च्या वर CEPI रेट असलेल्या उद्योगाच्या केंद्रांना 'क्रिटीकली पोल्यूटेड' म्हणून ओळखलं जातं.
प्रदूषणात सर्वाधिक वाटा लॉयड मेटलचा : घुग्गुसच्या एकूण प्रदूषणात लॉयड मेटल्सचा सर्वाधिक वाटा आहे. येथे होणाऱ्या प्रदूषणामुळं 2018 मध्ये उच्च न्यायालयानं या प्रकल्पाला बंद करण्याचे आदेशही दिले होते. आता याच कंपनीच्या प्रकल्पाचं विस्तारीकरण होणार आहे.
शेतीचं मोठं नुकसान : लॉयड मेटल्स या कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळं लगतच्या गावातील शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यामुळं उत्पादक क्षमता दिवसेंदिवस कमी होत असून कापसाचं मोठं नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया उसगाव येथील शेतकरी सागर ठाकरे आणि सूरज असुटकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही : "आमच्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतेय, असा आरोप सातत्यानं केला जातोय. मात्र, यात काहीही तथ्य नाही. आमच्याकडे प्रदूषण मोजणारं यंत्र लावण्यात आलय, ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी जोडलेले आहेत त्यात प्रदूषणाची आकडेवारी पाहता येते. त्यात आम्ही कुठल्याही प्रदुषणच्या नियमांचं उल्लंघन करत नाही असं दिसून येतं," अशी प्रतिक्रिया लॉयड कंपनीचे महाव्यवस्थापक प्रशांत पूरी यांनी दिली.
स्थानिकांचा तीव्र विरोध : नव्या प्रकल्पासंदर्भात सोमवारी (दि. 30) प्रदूषण नियंत्रण मंडळानं घुग्गुस येथे आयोजित केली, त्याला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी कंपनीच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली. कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणाची आपल्याला मोठी किंमत मोजावी लागत आहे. श्वसनाचे आजार, त्वचारोग, हृदयविकार, कर्करोग अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतंय. स्थानिकांना रोजगार काही गावांचा विकास केवळ कागदावरच असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती खबरदारी किंवा उपाययोजना करण्याकडे या कंपनीनं नेहमीच दुर्लक्ष केलं. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही नोटीस देण्यापलीकडे काही केलं नाही. त्यामुळेच आमचा या प्रकल्पाला विरोध आहे, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली. पर्यावरण अभ्यासकांनीही या प्रकल्पाला प्रचंड विरोध केलाय.
खासदारांनी व्यक्त केला संताप : चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंपनीच्या कामावर असमाधान व्यक्त करत, नियमबाह्य कामं केल्यास कारवाईसाठी पुढाकार घेऊ, अशी भूमिका मांडली. या कंपनीकडून प्रदूषणाच्या नियमांचं वारंवार उल्लंघन होत असून कारवाई होत नाही. यापुढं असं झाल्यास आपण याचा पाठपुरावा करणार, असल्याचं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
हेही वाचा
- उल्हास नदी पात्रात जलप्रदूषण; हरित लवादानं ठाणे महापालिकेला ठोठावला 102 कोटींचा दंड - Sewage Water In Ulhas River
- पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्यात आले की उद्योग बाहेर जातात; संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut On Amit Shah
- मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट, लक्ष्मण हाके यांचा आरोप; म्हणाले "मद्यपान केल्याचा पुरावा दाखवा" - Laxman Hake Allegations