सातारा Jayakumar Gore : माण-खटाव विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह मायणी मेडिकल कॉलेजच्या संपूर्ण संचालक मंडळावर शुक्रवारी वडूज (ता. खटाव) पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक देविदास बागल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
गोरेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या मायणी मेडिकल कॉलेजचं कोविड काळात अधिग्रहण करण्यात आलं होतं. या दरम्यान 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवत कागदोपत्री पुरावा तयार केल्याचा आरोल करण्यात आला आहे. रुग्णांसाठी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी हडपल्याचा दावा करत मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल : या प्रकरणाची चौकशी करुन भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरेंसह इतरांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणीही कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी याचिकेत केली होती. 5 जुलै रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकांना नोटीस पाठवण्याचे निर्देश दिले होते.
सुनावणीच्या आदल्या दिवशी गुन्हा दाखल : या प्रकरणाची सोमवारी (12ऑगस्ट) उच्च न्यायालयात पुढील सुनावणी असताना आदल्याच दिवशी मायणी मेडिकल कॉलेजच्या कोविड घोटाळा प्रकरणात आमदार जयकुमार गोरेंसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत कोविड रुग्णांच्या नावे गोरेंनी कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप करणाऱ्या दीपक देशमुख यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळं साताऱ्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आलं आहे.
गुन्हा दाखल, पण संपूर्ण प्रक्रिया तपासावर : कोविड काळातील घोटाळ्यासंदर्भात वडूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु, संपूर्ण प्रकरण तपासावर ठेवलं आहे. मेडिकल कॉलेजच्या संचालक मंडळाला आरोपी करण्यात आलंय. याप्रकरणाच्या तपासाला विलंब होणार आहे. त्यामुळं याप्रकरणात कोणाला अटक होणार का, हे पाहणं महत्वाचं आहे.
याचिकाकर्त्याच्या घरावर ईडीची धाड : मायणी मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्याच्या घरावर 9 ऑगस्ट रोजी ईडीनं धाड टाकली होती. कटुंबातील महिला, लहान मुलांना काही तास हालचाल करू दिली नव्हती. ईडीच्या याविरोधात मायणी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.