मुंबई Manoj Jarange Patil Allegations : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (26 फेब्रुवारी) सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच भाजपाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पित करून दिवसभरासाठी दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. परंतु, आज दिवसभर विधानभवन परिसरामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचा विषय चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या आमदारांनी याबाबत भाष्य केलं आहे.
१०० जन्म घ्यावे लागतील: भाजपा नेते नितेश राणे म्हणाले आहेत की, ''उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी जरांगे पाटलांना शंभर जन्म घ्यावे लागतील. मराठा आरक्षणाच्या प्श्नाबाबत अनेकांनी मोर्चे काढले. मनोज जरांगे पाटील हे शरद पवार गटाचे अतिशय जवळचे आहेत. राजकारण सोडून जर त्यांनी भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण, एक व्यक्ती समाजाची बदनामी करत असेल तर ते चुकीचं आहेत. त्यांची आता राजकीय वक्तव्य समोर येत आहेत. संपूर्ण मराठा समाजाबरोबर आमचं महायुतीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा जरांगे पाटील बोलत आहेत. म्हणून ही स्क्रिप्ट नेमकी कोणाची आहे? हे तपासावं लागेल. कुठल्याही राजकीय आंदोलनाला आम्ही पाठिंबा देणार नाही. प्रत्येकाचे पत्ते आमच्याकडे आहेत.''
फडणवीस यांनी मराठा समाजासाठी भरपूर केले: याबाबत बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ''जरांगे पाटील मुंबईकडे न येता परत माघारी फिरले म्हणून त्यांचे धन्यवाद मानतो. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू नयेत. फडणवीस यांनी मराठा समाजासाठी भरपूर केलं आहे. जरांगे पाटील कुठल्या गैरसमजातून बोलत आहेत? ते माहीत नाही. त्यांची वक्तव्यं ही राजकीय असल्यानं त्यांना आता समाजाचा पाठिंबा भेटणार नाही.''
पूर्ण प्रकरणाची चौकशी करा: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप भाजपा तसेच महायुतीतील नेत्यांच्या जिव्हारी लागले आहेत. भाजपा नेत्यांनी तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर पलटवार करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विशेष करून काँग्रेसनं या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा:
- मराठा आरक्षण मुद्दा तापला; अंबडमध्ये आंदोलकांनी पेटवली एसटी बस, संचारबंदी लागू, इंटरनेट, बस बंद
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक; विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- बारामतीवर एकहाती वर्चस्व गाजवलेल्या पवार कुटुंबातच वर्चस्वाची 'लढाई'; लोकसभेत शरद पवारांची 'लेक आणि सुने'मध्ये थेट लढत?