बारामती Lunch Invitation Rejected : बारामती शहरात उद्या शनिवारी 'नमो' रोजगार मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी त्यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी भोजनाचं खास आमंत्रण दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
![मुख्यमंत्री शिंदेंच पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/01-03-2024/whatsapp-image-2024-03-01-at-51322-pm_0103newsroom_1709294108_642.jpeg)
पूर्वनियोजित कार्यक्रम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला असला, तरी शरद पवार हे मात्र ठामपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांशी संघर्ष रंगत आहे. अशातच बारामतीत होत असलेल्या नमो रोजगार मेळाव्याला सरकारकडून शरद पवार यांना निमंत्रण देण्याचं टाळण्यात आलं होतं. त्यानंतर पवारांनीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण देत त्यांची कोंडी केली होती. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळं भोजनास येऊ शकत नाही, असं उत्तर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून शरद पवार यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही हे निमंत्रण नाकारलं आहे.
![उपमुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/01-03-2024/whatsapp-image-2024-03-01-at-51320-pm_0103newsroom_1709294108_1026.jpeg)
शरद पवारांचं पत्र : शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, 'आपण शनिवारी (दि. 2 मार्च) रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचं समजलं. या शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसंच, नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. यासाठी विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो. आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथम येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविंदबाग' या माझ्या निवासस्थानी अतिथी भोजनाचा आस्वाद घ्यावा, असं मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिलं आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचा देखील स्वीकार करावा," असं पवार यांनी पत्रामध्ये नमूद केलं होतं.
हेही वाचा :