मुंबई Mumbai Hijab and Burqa Ban News : मुंबईतील चेंबूर परिसरातील महाविद्यालय प्रशासनानं विद्यार्थिनींना हिजाब आणि बुरखा परिधान करण्यास घातलेल्या बंदी विरोधात 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आता 19 जून रोजी सुनावणी होणार आहे.
चेंबूर येथील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालय प्रशासनानं मे महिन्यात विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवून कॉलेजमध्ये बुरखा, हिजाब आणि नकाब परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे निर्देश दिले होते. त्यामुळं या विद्यार्थिनींनी आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं नमूद करत वकील अल्ताफ खान यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर आणि राजेश न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.
याचिकेत काय म्हटलंय? : महाविद्यालयाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकेत, महाविद्यालय प्रशासनानं विद्यार्थिनींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक संदेश पाठवून हिजाब, बुरखा, नकाब, टोपी, दुपट्टा, ओढणी याच्यावर ड्रेस कोड लागू करून प्रतिबंध घातल्याचं म्हटलंय. तसंच हा प्रकार म्हणजे केवळ सत्तेचा दुरुपयोग असून अन्य काही त्यामध्ये नाही, असा आरोपदेखील याचिकेतून करण्यात आलाय.
कॉलेजनं लागू केला ड्रेसकोड- हिजाब, नकाब आणि बुरखा हा आमच्या धार्मिक आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यावर बंदी लागणं हा आमच्या मूलभूत अधिकारावर हल्ला असल्याचं विद्यार्थिनींनी म्हटलंय. त्यामुळं उच्च न्यायालयानं याप्रकरणी सुनावणी घेऊन कॉलेज प्रशासनाच्या या तुघलकी निर्णयाला रद्द करावं, अशी मागणी विद्यार्थिनींनी याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाकडं केली आहे. ही याचिका दाखल करणारे वकील अल्ताफ खान म्हणाले, "या मुली चेंबूर गोवंडी परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. त्यांच्या कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर 1 मे रोजी कॉलेज प्रशासनानं संदेश पाठवून हिजाब बंदीचा आदेश दिला. या तथाकथित ड्रेस कोडमध्ये कॉलेजमध्ये मुली केवळ भारतीय किंवा पाश्चिमात्य पद्धतीचा ड्रेस घालू शकतात. मात्र, तो ड्रेस पूर्ण फॉर्मल असावा तसंच हिजाब, टोपी परिधान करणं टाळावं, असं त्यात नमूद करण्यात आले," असे खान यांनी सांगितलं.
विद्यार्थिनींना सवलत नाही-एनजी आचार्य आणि डी. के. मराठी कॉलेज ही महाविद्यालयं मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. या विद्यार्थिनींना त्यांच्या सुरुवातीच्या कालावधीत कोणत्याही हिजाब बंदीला सामोरं जावं लागलं नव्हतं. कॉलेजच्या परिसरात किंवा वर्गात अशा प्रकारची बंदी यापूर्वी लादण्यात आली नव्हती. तसंच महाविद्यालयाचा कोणताही युनिफॉर्म ठरवण्यात आलेला नव्हता. वरिष्ठ महाविद्यालयातील मुली वर्गामध्ये हिजाब घालून बसत असत. कारण त्यांना हिजाब परिधान करणं सोईस्कर वाटतं. हास्यास्पद बाब म्हणजे महाविद्यालयानं या ड्रेसकोडला आठवड्यात एक दिवस म्हणजे गुरुवारी सवलत दिली आहे. त्यामुळं त्या दिवशी विद्यार्थिनी दुसरा कुठलाही ड्रेस घालू शकतील. मात्र, हिजाब परिधान करण्यावरील बंदीमधून विद्यार्थिनींना सवलत देण्यात आलेली नाही.
हेही वाचा -