मुंबई MLA Rajan Salvi : एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, आजच्या सुनावणीवेळी सरकारी वकील गैरहजर असल्यामुळं मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केलीय. त्यामुळं राजन साळवी यांच्या कुटुंबीयांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसह त्यांच्या कुटुंबीयांवर एसीबीनं गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. एसीबीनं राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी तसंच मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजन साळवी यांनी मात्र अद्याप अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला नाहीय. मुलगा तसंच पत्नीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मात्र, सुनावणी वेळी सरकारी वकील गैरहजर असल्यामुळं न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केलीय.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा : रत्नागिरी एसीबीनं शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पत्नी, मुलाला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. पण, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर साळवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी झाली. दरम्यान, राजन साळवी हे रायगड एसीबीसह रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात सात वेळा हजर झाले आहेत. त्यांनी आपल्या संपत्तीची माहितीही सादर केली आहे. आतापर्यंत साळवी यांचा भाऊ, पुतण्या, पत्नी, मुलगा तसंच स्वीय सहाय्यकाची चौकशी करण्यात आली आहे.
काय आहेत राजन साळवींवर आरोप? : राजन साळवी यांच्यावर ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 या 14 वर्षांमध्ये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. साळवी यांच्याकडं 3 कोटी 53 लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची एकूण संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप एसीबीनं केला आहे. यापूर्वी राजन साळवी सात वेळा एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्याचा भाऊ, पुतण्या, वहिनी तसंच स्वीय सहायक यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची चौकशी देखील एसीबीनं केली आहे. या प्रकरणात राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी तसंच मोठ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
हे वाचलंत का :