अहमदनगर Biroba Yatra : अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावाच्या बिरोबाच्या यात्रेत (Kauthewadi Biroba Yatra) आगीचा थरारा बघावयास मिळतो. डोक्यावर पेटलेले कठे. त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला. शरीरावर ओघळणारे उकळते तेल हा एक अदभुत नजारा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत हजेरी लावतात.
अशी आहे परंपरा : अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील कौठेवाडी हे एक आदिवासी गाव. रात्री विरभद्राच्या मंदिरात अविरतपणे घंटानाद सुरु होतो. देवाच्या नामाचा जयघोष. संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, ताशा अशा पारंपारिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असं लयबद्ध होणारा भाविकांचा चीत्कार. बिरोबाचा गजर करत मंदीराला प्रदक्षिणा मारत भाविक नवसपुर्ती करतात. अंधारात दिसणारा हा थरार भाविकांना स्तबध करतो. तर कठा डोक्यावर घेतलेले भाविक उघडया अंगावर ओघळणार तप्त तेल, पडणारे निखारे, अनवानी पायांना बसणारे चटके सहन करतात. बिरोबाचा नामोगजर केल्यानं हे सर्व सहज शक्य होत असं नवसपुर्ती झालेल्या भाविक सांगतात.
भाविक बिरोबाच्या मंदीराला फेऱ्या मारतात : कौठवाडीया गावात ही यात्रा 'कठ्याची यात्रा' म्हणून प्रसिद्ध आहे. कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग अशा ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकड या घागरीत उभी भरतात. त्यात कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूनं त्याला सजवलं जातं. या यात्रेचे वैशिट्य म्हणजे हेच पेटलेले कठे (घागर) डोक्यावर घेवून धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदीराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीगणिक किलो-किलो तेल या ढणढणत्या कठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेलं तेल कठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळत. मात्र लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्यानं अथवा तप्त तेलानं एखाद्या भाविकालाही इजा होत नाही.
राज्यभरातून भक्त दाखल : नवसपूर्ती झाल्यानंतर श्रद्धाळू आदिवासी भाविक कठा घेवून येतात. दरवर्षी यात्रेत 60 ते 70 कठे असतात. एकाचवेळी ते पेटवले जातात. परिसरातले भक्तगण ज्यावेळी हे कठे डोक्यावर घेवून मिरवतात. त्यावेळी रात्रीच्या काळोखात एक अद्भूत दृश्य दिसू लागतं. हा थरार अनुभवण्यासाठी राज्यभरातून भक्त येथे येतात. अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, कल्याण, भाविक लाखोंच्या संख्येनं सहभागी होतात.
मोगलांच्या काळातील बिरोबा देवस्थान : ही प्रथापंरा कधी सुरू झाली याच्या काही अख्याईका सांगितल्या जातात. त्यातील एक मोहल कालीनही आहे. जूने जाणत्यांच्या मतं हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. तेव्हा काही लोक कौठेवाडी येथे आले आणि येताना आपला दगडरुपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले तेव्हा लहानसा दगड काही केल्यानं हलेना. तेव्हा हा प्रांत जाहगिरी खाली होता. येथिल जाहगिरदारानं आम्हाला म्हणजे भोईर आणि भांगरे यांना येथे कसण्यास जमीन देवून येथेच स्थायिक होण्यास सांगितलं. तेव्हापासून आम्ही येथे बिरोबाची पुजा करतो असं भाविक सांगतात.
अशी आहे अख्यायिका : कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि अख्यायिका आहेत. पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेवून आला होती. तेव्हा त्यांच्यावर आलेल संकट बिरोबाच्या नवसान दूर झाले आणि ते भयमुक्त झाले. तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठ्याची परंपरा सुरू आहे. आजही राज्यभरातून भाविक या यात्रेसाठी येतात. बिरोबाला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर नवसपुर्तीसाठी कठा अर्पण करतात. याला श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा मात्र पूर्वापार चालत आलेली ही परंपरा या आदिवासी बांधवांनी आजही अखंडीत ठेवली आहे.
हेही वाचा -
- श्रीरामनवमी उत्सव काळात भाविकांचे साई चरणी 3 कोटी 79 लाखांचे दान; दोन लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं साई दर्शन - Shirdi Sai Sansthan
- साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी शिर्डीत; पाहा व्हिडिओ - Nita Ambani Sai Baba Darshan
- शिर्डीतील रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पाहा ग्राऊंड रिपोर्ट - Ram Navami 2024