मुंबई Lata Mangeshkar Music Collage : आचारसंहितेपूर्वी आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असताना दुसरीकडे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय इमारतीचे ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, जे. जे. महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, कृष्णा मंगेशकर आणि अधिकारी तसंच अन्य मंत्री उपस्थित होते.
सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल : संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आणि मोठे भव्य-दिव्य असं संगीत महाविद्यालय देशात असावं या हेतूनं राज्य सरकारनं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्यूझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली होती. आज या संगीत महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
कसं असणार संगीत महाविद्यालय ? : भारतरत्न लता मंगेशकर यांचं संगीत क्षेत्रात मोठं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आहे. तसंच हे संगीत महाविद्यालय आंतरराष्ट्रीय पातळीचं असावं, अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळं सांताक्रूझ (पूर्व) येथे 7 हजार चौ. मीटर जागेवर हे महाविद्यालय साकारले जाणार आहे. या ठिकाणी चारशे आसनव्यवस्थेचं सभागृह असणार आहे. तसंच 18 क्लासरुम्स, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन असणार आहेत. इथे 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 300 आसनी खुलं सभागृह आणि शिक्षकांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत. हे संगीत महाविद्यालय भव्य दिव्य असणार आहे.
हेही वाचा :
- Pravin Darekar : महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका...; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला
- Electoral Bond Case: इलेक्टोरल बाँड्सचं सीलबंद लिफाफ्यात दडलयं रहस्य, एसबीआयनं सर्वोच्च न्यायालयात काय दिली माहिती?
- Lok Sabha Election 2024 :पंतप्रधानांच्या नावावरच निवडणुका लढवायच्या, तर शिंदे, पवारांना जास्त जागा का द्यायच्या ; 'संघा'चा भाजपा पक्षश्रेष्ठींना सवाल ?