मुंबई Arya Gold Company : मुंबईतील अंधेरी येथील 'आर्य गोल्ड' (Arya Gold) या हिरे उत्पादन करणाऱ्या कंपनीने उत्पादक व्यवस्थापक या पदासाठी जाहिरात केली होती. मात्र, या जाहिरातीत विविध पात्रतेच्या अटी सोबतच पुरुष अर्जदार 'नॉन महाराष्ट्रीयन' म्हणजे 'अमराठी' (Non Maharashtrian) असावा अशी संताप जनक अट घातली होती. मुंबईतील काही गृह संकुलांमध्ये मराठी कुटुंबांना घरे विकत देण्याबाबत मज्जाव करण्यात येत असल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या होत्या. त्या पाठोपाठ मुंबईत मराठी माणसाची गळचेपी सुरू असल्याची ही आणखी एक घटना समोर आल्यानंतर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
महाराष्ट्रात मराठी माणसाला डावलू शकत नाही : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'आर्य गोल्ड' ही कंपनी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील वीज, पाणी तसेच इथल्या साधन संपत्तीचा वापर करायचा आणि मराठी माणसाला नोकरी नाही, असं म्हणायचं हा महाराष्ट्रद्रोह आहे. शासनाचा नियम आहे की, कोणत्याही खाजगी कंपनीत 80 टक्कांना स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. याबाबतचा कायदा नसेल तर हे मनाला वाटेल तसे काम करतात. आता तर या कंपनीमध्ये महाराष्ट्रा बाहेरील एकही व्यक्ती कामाला लागू नये असा आमचा आग्रह आहे. महाराष्ट्रात एवढे कुशल कामगार असताना त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, महाराष्ट्राची अस्मिता टिकून राहिली पाहिजे. सरकारच्या दुर्लक्षामुळं हे होत असून यांना पैसे कमवण्यासाठी यांनी बाहेरच्या लोकांचा गोतावळा उभा केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
अन्यथा मनसे स्टाईल बंदोबस्त : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, ही घटना आमच्या लक्षात आली आहे. याची आमच्या पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. आमच्या कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कंपनीत प्रत्यक्ष भेट देत आहेत. मात्र महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता सरकारने या लोकांचा बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने यांचा बंदोबस्त करेल.
हेही वाचा -
सरकारनं सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचे आणखी 2 खंड केले जारी; 'इथून' करू शकता खरेदी
भारत आपला सोन्याचा साठा परदेशी तिजोरीत का ठेवतो? - GOLD RESERVES IN FOREIGN VAULTS