सातारा Shivshahi Bus Fire Satara - सांगली आगाराच्या शिवशाही बसने साताऱ्यातील वाढेफाटा इथं अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. बस पुण्याहून सांगलीकडे जात असताना ही घटना घडली. बसमधून २१ जण प्रवास करत होते. त्यांना सुखरूप बाहेर काढल्यानं अनर्थ टळला.
शिवशाही बसला अचानक लागली आग : राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराची शिवशाही बस (क्र. एम. एच. ०६ बी. डब्ल्यू. ३७२२) ही स्वारगेटहून सांगलीकडे निघाली होती. मंगळवारी दुपारी साताऱ्यातील वाढे फाटा येथे बसमधून धूर येऊ लागल्यानं चालक-वाहकाने सर्व प्रवाशांना बसमधून उतरवलं. तोपर्यंत गाडीने पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केलं. मात्र, बसमधील सर्व २१ प्रवाशी सुखरूप आहेत.
महामार्गावर आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट : शिवशाही बसने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळत होते. त्यावरून आगीची भीषणता लक्षात येत होती. बसमधून खाली उतरलेले प्रवाशी आगीची भीषणता पाहून घाबरले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवली. त्यानंतर एसटी महामंडळाच्या सातारा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बसला नेमकी कशामुळे आग लागली, हे स्पष्ट झालेले नाही.
तीन वर्षांपूर्वी घडलं होतं अग्नितांडव : सातारा डेपोत १० फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास उभ्या असलेल्या सहा शिवशाही बस जळून खाक झाल्या होत्या. एका बसला आग लागल्यानंतर शेजारच्या गाड्यांनीही पेट घेतला होता. त्यावेळी भर आगारात अग्नितांडव पाहायला मिळालं होतं.