पुणे : विविध क्षेत्रामध्ये तसंच पोलीस खात्यात 'आयर्न मॅन' हा खिताब अनेकांनी पटकावलेला आपण पाहिलं आहे. पण वयाच्या 56 वर्षी पोलीस खात्यात राहून नुकतच वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे आयोजित 'आयर्न मॅन' स्पर्धेत यश मिळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे हे पहिलेच पोलीस अधिकारी ठरले आहेत.
वयाच्या 56 व्या वर्षी स्पर्धेत सहभाग : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे आणि त्यांचे सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे आयोजित 'आयर्न मॅन' स्पर्धेत यश मिळवलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या या कामगिरीबद्दल सध्या पोलीस दलात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे 1 डिसेंबर रोजी 'आयर्न मॅन' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जगभरातून 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पुण्यातील जवळपास 14 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी पुण्यामध्ये कार्यरत असलेले आणि सध्या ठाणे आयुक्तालय येथील उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी वयाच्या 56 वर्ष या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
एव्हरीथिंग इज पॉसिबल : " 'आयर्न मॅन' स्पर्धेत 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी धावणं हे सलग 17 तासामध्ये पूर्ण करणं आवश्यक असतं. ते करत असताना स्पर्धकाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागतो. "एव्हरीथिंग इज पॉसिबल" हे या स्पर्धेचं ध्येय वाक्य आहे. त्या अर्थानं स्पर्धक हा कोणत्याही वयामध्ये ही कामगिरी करू शकतो. यामधूनच प्रेरणा घेऊन मी 56व्या वर्षी या स्पर्धेत सहभाग घेऊन त्यात यश मिळवलं," असं यावेळी विष्णु ताम्हाणे यांनी सांगितलं.
पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी कार्यक्रमांचं आयोजन : "मी पुण्यात कार्यरत असताना पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मॅरेथॉन स्पर्धा आणि सायकलिंग अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत होतो. तसंच 'आयर्न मॅन' स्पर्धेसाठी देखील तयारी करत होतो. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता, पण त्यात यश आलं नाही. परंतु मी न डगमगता या स्पर्धेची तयारी करत राहिलो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वरिष्ठांच्या आदेशानं या स्पर्धेत सहभाग घेतला आणि या स्पर्धेत यश मिळवलं आहे," असं विष्णु ताम्हाणे यांनी सांगितलं.
हेही वाचा