हैदराबाद Team India for Zimbabwe Tour : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या टी 20 विश्वचषकामध्ये धुमाकूळ घालत आहे. संघानं उपांत्य फेरीतील आपलं स्थान जवळपास पक्कं केलं आहे. भारतीय संघाला विश्वचषकानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचं आहे. त्यात झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडं कर्णधारपद सोपवण्यात आलंय.
विश्वचषक संघातून केवळ 2 खेळाडूंची निवड : पाहिल्यास टी 20 विश्वचषकाच्या मुख्य संघात समाविष्ट असलेल्या 15 पैकी 13 खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी विश्वचषक संघातून केवळ यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांची निवड करण्यात आलीय. शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग आणि खलील अहमद यांची टी 20 विश्वचषकासाठी राखीव म्हणून निवड करण्यात आली होती आणि ते मुख्य संघाचा भाग नव्हते. गिल, रिंकू, आवेश आणि खलील यांनाही संघात स्थान मिळालं आहे. मात्र गिलला या दौऱ्यासाठी थेट कर्णधार बनवण्यात आलं आहे. निवड समितीनं सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला या दौऱ्यावर जाण्याबद्दल विचारलं होतं. परंतु, दोघांनीही विश्रांती घेण्याचं सांगितलं. त्यामुळं गिलकडं संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आली.
🚨 NEWS
— BCCI (@BCCI) June 24, 2024
India’s squad for tour of Zimbabwe announced.#TeamIndia | #ZIMvIND
रीयान-नितीश आणि अभिषेकला संधी : आयपीएल 2024 च्या मोसमात चमक दाखवणाऱ्या खेळाडूंची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आलीय. यामध्ये अभिषेक शर्मा, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी या नावांचा समावेश आहे. परागनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चांगली खेळी केली होती. परागनं गेल्या हंगामात 500 हून अधिक धावा केल्या होत्या. तर नितीशकडं पुढील वेगवान अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातंय. त्यानं आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी आपली उपयुक्तता दाखवली आहे. तर पंजाबमधून आलेल्या अभिषेक शर्मानं गेल्या वर्षभरात आपल्या तुफानी फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यालाही प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे.
झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रीयान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे
भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा :
- 6 जुलै - पहिला टी 20 सामना, हरारे
- 7 जुलै - दुसरा टी 20 सामना, हरारे
- 10 जुलै - तिसरा टी 20 सामना, हरारे
- 13 जुलै - चौथा टी 20 सामना, हरारे
- 14 जुलै - पाचवा टी 20 सामना, हरारे
हेही वाचा :