मुंबई Mumbai Open WTA Tennis : देशातील खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळण्याची संधी आणि जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुंबईत ओपन डब्लूटीए टेनिस स्पर्धा सुरू होणार आहे. ही स्पर्धा 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीदरम्यान खेळली जाईल. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित या स्पर्धेत तब्बल सव्वा लाख डॉलर्स रकमेचं पारितोषिक ठेवण्यात आलंय.
या खेळाडूंना 'वाईल्ड कार्ड'द्वारे थेट प्रवेश : या स्पर्धेतील मुख्य फेरीत अंकिता रैना, सहजा यमलापल्ली आणि ऋतुजा भोसले या भारताच्या तीन आघाडीच्या खेळाडूंसह उदयोन्मुख वैष्णवी आडकर हिला वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आलाय. "या स्पर्धेमुळे भारतातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. यामुळे खेळाडूंना त्यांची क्रमवारी सुधारण्यास आणि जागतिक स्तरावरील उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पुरेसा अनुभव मिळेल'', असं आयोजन समितीचे सदस्य संजय खंदारे आणि प्रविण दराडे यांनी सांगितलं. "महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यामुळे आम्ही एटीपी टूर, डेव्हिस करंडक, एटीपी चॅलेंजर्स आणि डब्लूटीए 125 स्पर्धा आयोजित करू शकलो," असं एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार यांनी सांगितलं.
मुंबईत 6 वर्षानंतर स्पर्धा : एल अॅण्ड टी मुंबई ओपन टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सहा वर्षांनी मुंबईत परतत आहे. या स्पर्धेत 2017 मध्ये आर्यना सबालेन्कानं विजेतेपद पटकावलं होतं. तर थायलंडच्या लुक्सिका कुमखुमनं 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. आता तब्बल सहा वर्षांनंतर ही स्पर्धा मुंबईत होत असल्यानं यासाठी खेळाडू उत्सुक असून, जागतिक दर्जाच्या स्पर्धेत खेळाडूंना उत्तम खेळ दाखवण्याची चांगली संधी मिळत असल्याचं बोललं जातंय.
हे वाचलंत का :