विशाखापट्टणम IND vs ENG 2nd Test : विशाखापट्टणम इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतानं इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केलाय. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रविचंद्रन अश्विन यांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. जैस्वालनं पहिल्या डावात 209 धावा केल्या. तर, बुमराहनं सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. चौथ्या दिवशीच हा सामना भारतीय संघानं जिंकला.
इंग्लिश फलंदाजांकडून निराशा : या सामन्यात 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ 292 धावांवरच मर्यादित राहिला. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून झॅक क्रॉलीनं संघासाठी 73 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, यात 8 चौकार आणि 1 षटकार होता. याशिवाय एकाही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, त्यामुळं त्यांना सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
जैस्वालचं द्विशतक : या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर पहिल्या डावात 396 धावा केल्या. यात यशस्वी जैस्वालनं संघासाठी 209 धावांची सर्वात मोठी खेळी केली, यात 19 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मात्र, याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेला इंग्लंड केवळ 253 धावांत गारद झाला. यानंतर भारतानं दुसऱ्या डावात 255 धावा फलकावर लावल्या आणि इंग्लिश संघाला 399 धावांचं लक्ष्य दिलं, जे त्यांना गाठता आलं नाही.
भारतीय संघाची घातक गोलंदाजी : दुसऱ्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं 3-3 बळी घेतले. याशिवाय मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारनं कसोटी पदार्पण केलं. त्याला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय अनुभवी गोलंदाज झहीर खाननं कसोटी कॅप दिली. रजतनं पदार्पणाच्या डावात 32 धावा केल्या. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट इथं सुरु होणार आहे.
हे वाचलंत का :