हैदराबाद Ind Vs Eng Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं 28 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडनं दुसऱ्या डावात 230 धावांची आघाडी घेतल्यानंतर फलंदाजीला आलेला भारतीय संघ 202 धावांवर गारद झाला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज ओली पोपनं 196 धावा ठोकल्या, तर पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलेनं 9 विकेट घेत अभूतपूर्व कामगिरी केली.
प्रथमच 100 हून अधिक धावांची आघाडी घेऊन पराभव : भारतीय संघानं याआधी आपल्या पहिल्या डावात विरोधी संघावर 100 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेऊन एकही सामना गमावला नव्हता. जेव्हा-जेव्हा कसोटीत दुसऱ्यांदा फलंदाजी करताना भारतानं 100 हून अधिक धावांची आघाडी घेतली, तेव्हा-तेव्हा भारतानं विजय मिळवलाय. मात्र, इंग्लंडच्या 246 धावांना प्रत्युत्तर देताना भारतानं 420 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली आणि पराभूत झाला.
हैदराबादमध्ये प्रथमच कसोटी सामना गमावला : यापूर्वी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले गेले होते. त्यापैकी चार सामने भारतीय संघानं जिंकले, तर एक सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर कसोटी सामना हरण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे. भारतानं हैदराबादमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचा पराभव केलाय. विशेष म्हणजे, मेन इन ब्लूनं हे सर्व सामने मोठ्या फरकानं जिंकले. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सहाव्या सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव झाला.
ओली पोपची ऐतिहासिक खेळी : या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज ओली पोपनं 196 धावांची खेळी केली. ही भारतात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विदेशी फलंदाजाद्वारे चौथी सर्वात मोठी खेळी आहे. झिम्बाब्वेचा फलंदाज अँडी फ्लॉवरनं 2000 साली भारताविरुद्ध 232 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्यानंतर 2010 मध्ये न्यूझीलंडचा फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमनं 232 धावांची इनिंग खेळली होती. तर गारफिल्ड सोबर्सनं 1958 मध्ये कानपूरमध्ये 198 धावांची खेळी केली होती. आज 196 धावांची इनिंग खेळल्यानंतर ओली पोप दुसऱ्या डावात मोठी खेळी खेळणारा चौथा परदेशी फलंदाज ठरला आहे.
हे वाचलंत का :