मुंबई Thackeray Group Meeting : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होत असून या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली कंबर कसलीय. तसंच यंदा निवडणुकीत दगाफटका टाळता यावा, यासाठी राज्यातील 4 प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईतील चार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरे गटानंही आपल्या 16 आमदारांच्या राहण्याची सोय एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केलीय. या निवडणुकीसाठी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली.
बैठकीला 4 आमदारांची दांडी : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार उभे आहेत. तर आम्ही 9 उमेदवार निवडून आणणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय. त्यामुळं महाविकास आघाडीची धाकधूक वाढलीय. तसंच निवडणुकीत दगाफटका बसू नये, म्हणून ठाकरे गटाकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ठाकरे गटाच्या 16 आमदारांची व्यवस्था मुंबईतील परेल ITC ग्रँड हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. बुधवारी (10 जुलै) पक्षाचे नेते अनिल परब यांच्याकडून सर्व आमदारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत 16 आमदारांपैकी केवळ 12 आमदार उपस्थित होते.
12 आमदारांची उपस्थिती 'या' आमदारांनी मारली 'दांडी' : या बैठकीत अजय चौधरी, वैभव नाईक, उदयसिंग राजपूत, राजन साळवी, प्रकाश फातर्फेकर, राहुल पाटील, सुनील प्रभू, सुनील राऊत, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, रमेश कोरगावकर, ऋतुजा लटके हे आमदार उपस्थित होते. तर कैलास पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, शंकरराव गडाख हे आमदार गैरहजर होते.
मुख्यमंत्री शिंदेही आमदारांच्या भेटीला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बुधवारी रात्री उशीरा आपल्या आमदारांची ताज लँड्स हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतली. दिल्ली इथून कृषीरत्न पुरस्कार स्वीकारुन ते थेट हॉटेलमध्ये आमदारांच्या भेटीसाठी गेले. यावेळी त्यांनी आमदारांना काही सूचनाही दिल्या. शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या सांगण्यानुसार हॉटेलमध्ये 40 आमदार उपस्थितीत असून बाकी 10 आमदार गुरुवारी दाखल होणार आहेत. दरम्यान, महायुतीकडं 200 तर महाविकास आघाडीकडं 65 आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, ठाकरे गटाला 8 तर भाजपाला 8 मतांची गरज आहे.
हेही वाचा -
- विधान परिषद निवडणुकीसाठी 'हॉटेल डिप्लोमसी'; मतांची फाटाफूट टाळण्यासाठी राजकीय पक्षांची 'धावपळ' - MLC ELECTION 2024
- विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष, छोट्या घटक पक्षांची मागणी वाढली; 'ही' मतं ठरणार किंगमेकर - MLC Election
- विधान परिषद निवडणूक घोडेबाजार होणार का; ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात - Vidhan Parishad election