मुंबई Uddhav Thackeray : भाजपा, विश्व हिंदू परिषद आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
शिवसेना तोडायला निघाले : यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलताना भाजपावर निशाणा साधलाय. बाबरी पडली त्यावेळी भाजपातील काहीजण बाळासाहेबांकडं आले होते आणि आम्हाला वाचवा, अशी विनवणी बाळासाहेबांकडं केली होती. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं होतं. त्यांना वाचवलं नसतं तर आज ते कुठेच दिसले नसते, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी लगावलाय.हिंदूमध्ये भेदभाव कशाला? : देशात हिंदू हे कुठल्याही जातीतील असो, पण शेवटी हिंदू हा हिंदू आहे. हिंदूमध्ये भेदभाव कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. यावेळी उद्धव ठाकरेंनी दिवंगत प्रमोद महाजन आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यातील एक किस्स्याची आठवण करून दिली. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा युतीची स्थापना केली तेव्हा 'गर्वसे कहो हम हिंदू है...' अशी घोषणा तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जेव्हा हिंदू असल्याचं सांगण्याची भीती होती तेव्हा 'गर्व से कहो हम हिंदू है...' असा नारा देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली.
संकटाच्या वेळी तुम्ही माझ्यासोबत : आज शिवसेनेसोबत गद्दारी करून अनेकजण बाहेर गेले. त्यातील काहींना शिवसेना संपवायची आहे. ज्यांना शिवसेनेनं आयुष्यभर सर्वकाही दिलं तेच आज गद्दारी करून बाहेर पडले आहेत. पण अशावेळी माझ्याकडं सत्ता नसताना तुम्ही माझ्यासोबत आलात. त्यामुळं मी तुमचं स्वागत करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सत्तेच्या बाजूनं जाणारे अनेक असतात, पण सत्ता सोडून संकटासोबत येणारे खरे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.