मुंबई Sanjay Raut On Kangana Ranaut : 24 जूनपासून संसदीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सोमवारी काही नवनिर्वाचित खासदारांनी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी अभिनेत्री कंगना रणौत यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी तिथं राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी केली होती. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून, याच पार्श्वभूमीवर आज (25 जून) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना कंगना रणौत यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले संजय राऊत : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातून त्यांच्यापेक्षाही अनेक वरिष्ठ खासदार निवडून गेले आहेत. त्यांना ती खोली मिळाली पाहिजे. कंगना रणौत यांनी ती खोली मागायची गरज नाही. त्या हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. पण हे कंगना रणौत यांना कोण समजून सांगणार?".
ड्रग्जला राजकीय संरक्षण कोणाचे : पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले, "पुणे आणि नाशिक ही दोन शहरं ड्रग्जच्या विळख्यात अडकलीत. संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात आहे. महाराष्ट्रात ड्रग्ज गुजरातमधून येत असल्याचं सिद्ध झालंय. हजारो कोटींचे ड्रग्ज गुजरातमध्ये पकडले गेलेत. गुजरात हे ड्रग्जचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. गुजरातमधून ड्रग्ज महाराष्ट्रातील विविध भागात वळवले जाते. याला राजकीय संरक्षण कोणाचं? याचा तपास होणं गरजेचं आहे. ड्रग्जचा हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात वापरला गेला? या काळात पुण्याचे पालकमंत्री कोण होते? पोलीस आयुक्त कोण होते? पुण्याचे लोकप्रतिनिधी कोण होते? हा एक अत्यंत मोठा तपासाचा विषय आहे. आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचं मुख्य केंद्र झालंय. या सर्वाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या वेळचे पालकमंत्री, पुण्यातील गेल्या पाच वर्षातील पोलीस आयुक्त आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत."
उपाध्यक्षपद आम्हाला मिळाले पाहिजे : पुढं राऊत म्हणाले, "आमची इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. आज इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक होणार असून मी सुद्धा काँग्रेस नेत्यांशी बोलतोय. भारतीय लोकशाहीत संसदेतील स्पीकरला मानाचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळं या ठिकाणी अशीच व्यक्ती बसली पाहिजे. ज्या व्यक्तीकडून सर्वांना समान वागणूक आणि न्याय मिळेल, अशी व्यक्ती तिथं विराजमान झाली पाहिजे. परंतु मागील दहा वर्षात त्या पदावर ज्या व्यक्ती बसल्यात, ते पाहता आता अशी मागणी करणं किंवा अपेक्षा धरणं अशक्य आहे. विरोधीपक्ष आता मजबूत आहे. हे पाहता आम्हालाही लोकसभा उपाध्यक्षपद मिळालं पाहिजे".
हेही वाचा -