पुणे Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या आंदोलन (Ravindra Dhangekar Protest) सुरू केलं आहे. पोलिसांकडून धंगेकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गप्प बसणार नाही - धंगेकर : रवींद्र धंगेकर म्हणाले, "घराघरात पैसे वाटले जात आहेत. विविध मार्गानं जनतेचा हडप केलेला पैसा या निवडणुकीत वापरून जिंकू, असं भाजपाला वाटत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जात आहेत. आजी-माजी नगरसेवक यांच्यापासून ते भाजपाचे वरिष्ठ नेते यात गुंतले आहेत. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. पैसे वाटणाऱ्यांची नावं सांगितली. तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. त्यामुळे आम्ही गप्प राहणार नाही. आम्हाला लोकशाही वाचवायची आहे. आम्हाला संविधान वाचवायचे आहे. निवडणुका पैसे वाटून नव्हे तर लोकशाही पद्धतीने व्हाव्यात, हीच आमची भूमिका आहे."
रवींद्र धंगेकर यांचा आरोप : पुणे लोकसभेची निवडणूक चुरशीची झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र घंगेकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या ही थेट लढत होत आहे. आरोपांची एकही संधी या दोन्ही उमेदवारांनी सोडली नाही. प्रचाराच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. आता तर चक्क पैसे वाटप झाल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय.
कार्यकर्ते आक्रमक : निवडणुकीपूर्वी पुणे शहरातील काही भागात सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. त्यासाठी धंगेकर यांनी चक्क पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर केला जाऊ शकतो, असा अंदाजही रवींद्र धंगेकर यांनी याआधीही व्यक्त केला होता. दरम्यान, धंगेकर यांनी ठिय्या सुरू केल्यानंतर पुण्यातील वातावरण तापलं आहे. यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते आमनेसामने आले होते.
पुण्यासाठी जोरदार फिल्डिंग : पुण्याच्या विकासावरुन रवींद्र धंगेकर हे नेहमीच भाजपावर टीका करत आले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत मुरलीधर मोहोळ हे काँग्रेसवर हल्ला चढवत आहेत. त्यामुळं 'हाय होलटेज' ड्रामा पुण्यात मागील एका महिन्यापासून सुरू होता. पुण्याच्या जागेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीनं मोठी फिल्डिंग लावली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. तर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आले होते.
हेही वाचा -
- शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 1708 मतदान केंद्रावर होणार मतदान - Shirdi Lok Sabha Constituency
- 12 राज्यांचे मुख्यमंत्री, 20 केंद्रीय मंत्री, 20 किमीचा 'रोड शो'; उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी मोदी करणार शक्तीप्रदर्शन - Lok Sabha Election 2024
- शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर...; प्रकाश आंबेडकरांचा सर्वात मोठा दावा - Lok Sabha Election 2024