रत्नागिरी Rajan Salvi On Uddhav Thackeray Konkan Visit : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांशी (ठाकरे गट) संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सोमवारी (5 फेब्रुवारी) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते येणार असून राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण येथे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली होती. यालाच आता शिवसेना (ठाकरे गट) उपनेते, आमदार राजन साळवी उत्तर दिलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्याचा अधिकार राणे किंवा अन्य कोणालाही नाही.
काय म्हणाले राजन साळवी : माध्यमांशी संवाद साधत असताना आमदार राजन साळवी म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळं प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी मनामध्ये कोणतीही शंका आणू नये. आजपर्यंत कोकण हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी आहे. उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोच्च होईल. त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा अधिकार राणे किंवा अन्य कोणालाही नाही. राणेंना मानाची पदं शिवसेनेमुळेच मिळाली, याचा विसर त्यांना पडू ही माझी त्यांना सूचना आहे." तसंच उद्धव साहेब, रश्मी वहिनी हे पहिल्यांदाच माझ्या निवासस्थानी येत आहेत. हा माझ्यासाठी सुवर्णदिवस असल्याचंही यावेळी राजन साळवी म्हणाले.
असा आहे उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा : उद्धव ठाकरे 5 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता कणकवली येथून राजापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता राजापूर शहरातील जवाहर चौक येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता राजापूरहून श्रीदेव धुतपापेश्वर मंदिराकडे प्रयाण करतील. सकाळी 11.45 वाजता श्रीदेव धुतपापेश्वर मंदिर दर्शन आणि मंदिर बांधकामाची पाहणी करतील. दुपारी 12.15 वाजता धुतपापेश्वर मंदिर येथून पावसमार्गे रत्नागिरी शहराकडे प्रयाण करतील. त्यानंतर 1.45 ला ते शिवसेनेच्या आठवडाबाजार येथील कार्यालयात शिवसैनिकांशी संवाद साधतील. दुपारी 2.15 वाजता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसह आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट देतील.
हे नेते दौऱ्यात होणार सहभागी- सायंकाळी 4.15 वाजता ते संगमेश्वर येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर 5.40 वाजता ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. सायंकाळी 6.15 वाजता चिपळूण येथून खेडकडे रवाना होतील. सायंकाळी 7.05 वाजता वंदे भारत एक्सप्रसने खेडहून मुंबईकडं रवाना होतील. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
हेही वाचा -