सातारा Prithviraj Chavan Criticized PM Modi : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झालंय. तसंच हा राजनैतिक भ्रष्टाचार आहे," असा त्यांनी आरोप केलाय.
सरकार पाडण्यात राजनैतिक भ्रष्टाचार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "हा भ्रष्टाचार दोन प्रकारचा आहे. एक अर्थिक भ्रष्टाचार आहे. हा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पुढं आला. पैसे दिले की नंतर कंत्राट मिळते. सीबीआय, ईडींची छापेमारी झाली की चार आठ दिवसात पैसे जमा होतात. त्यानंतर छापे बंद होतात. दुसरा भ्रष्टाचार हा वैचारिक, राजनैतिक आहे. हा भ्रष्टाचार सरकार पाडण्यावेळी झाला. अशा राजनैतिक भ्रष्टाचारामुळं यापुढं कुठलंच निवडून आलेलं सरकार टिकू शकणार नाही", अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यात अपयश : पुढं ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यात अपयश आलेलं आहे. त्यामुळं महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय. मोदी सरकारला शेती विधेयकं मागे घ्यावी लागली. त्यामुळं सरकारनं धोरणात कांदा, गहू, भात, साखरेवर निर्यातबंदी आणली. दर वाढायला लागले की बाहेरून माल आयात करायचा आणि दर पाडायचे. हे का चाललंय? अशा धोरणामुळं शेतकरी अत्यंत अडचणीत आलाय."
संविधान बचाव हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा : "देशाचं संविधान हा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा आहे. संविधान बचाव हे फक्त आंबेडकरी जनतेपुरतं नाही. संविधानामुळं बहुजन समाजालाही फायदा मिळालाय. स्वातंत्र्यापूर्वी आमची काय परिस्थिती होती? त्यामुळं संविधान आम्ही बिलकुल जाऊ देणार नाही. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, संविधान, निर्यातबंदी या पाच मुद्यांवर निवडणुकीतील लढाई असून हे राष्ट्रीय मुद्दे आहेत. मोदींनी याची उत्तरं दिली पाहिजेत", अशी मागणी चव्हाण यांनी केली.
मोदींकडून ध्रुवीकरणाचा प्रचार : "मोदी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात काहीच बोललेले नाहीत. मंगळसूत्र, दागिन्यांचं ऑडीट होईल, असा त्यांचा ध्रुवीकरणाचा प्रचार चाललाय. पंतप्रधान असं बोलतात, याची आम्हाला लाज वाटते, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदींना 'चारसो पार'चा आत्मविश्वास असेल तर सॅम पित्रोदांचे मुद्दे उचलायचं कारण काय? त्यामुळं सत्ताधाऱ्यांची कुठं तरी चलबिचल झालीय किंवा काँग्रेसचं सरकार येईल, असं त्यांना वाटतं असावं," असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
यंदाची निवडणूक 1977 च्या निवडणुकीसारखी : "यंदाची निवडणूक मला आणीबाणीनंतरच्या 1977 मधील निवडणुकीसारखी वाटतेय. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होतं. लोकशाही वाचवायची असेल तर इंदिरा गांधींचा पराभव केला पाहिजे, असं वातावरण झालं होतं. त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि आमचं सरकारही गेलं. तशा प्रकारचं वातावरण मला यावेळी दिसतंय. मोदींच्या विरोधातील वातावरण मतांमध्ये परावर्तीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं, पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
मत विभागणी टाळण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना : "सत्ताधाऱ्यांविरोधातील मतांची विभागणी होऊ नये, हा इंडिया आघाडी निर्माण करण्यामागचा उद्देश होता. आमची मतं विभागली गेली नाहीत, तर नक्की इंडिया आघाडीला बहुमत मिळेल," असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. "तसंच यापूर्वी मोदींच्या विरोधात 60 ते 70 टक्के लोकांनी मतदान केलंय. ते जर एकवटले तर मोदींचा पराभव होऊ शकतो," असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
उज्ज्वल निकम यांचा उमेदवारी घेण्यास नकार : भाजपानं ॲड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "आम्हीही त्यांना उमेदवारीबद्दल विचारणार केली होती. पण, त्यांनी नकार दिल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्र्यांनी केला. पुढे ते म्हणाले, " महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 28 पेक्षा जास्त जागा मिळतील. भाजपाचं मोठं नुकसान होईल. तसंच अमरावतीत आम्ही नक्की जिंकू", असा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -