छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Nana Patole News : "एकीकडं राज्यात दुष्काळ असून शेतकरी त्रस्त आहे. तर राज्यकर्ते मात्र विदेशात जाऊन बसलेत. शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची काळजी घ्या, जालना जिल्ह्यात बँकेचं कर्ज न मिळाल्यानं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. हे सर्व यंत्रणेमुळं होतंय. त्यावर कारवाई करावी, अन्यथा सरकार विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल," असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.
फळबाग शेती अडचणीत : मराठवाड्यातील फळबागा अडचणीत सापडल्या आहेत. फळबागा जगवण्यासाठी अनेक वर्षे जातात. मात्र, पाणी नसल्यानं त्या नष्ट होत असल्यानं दोन लाख हेक्टरी मदत द्या, अशी मागणी पटोले यांनी केली. पुढं ते म्हणाले की, "विधानसभेत सूचना देऊनही दुर्लक्ष केल्यानं राज्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून याला राज्य सरकारचं दुर्लक्ष कारणीभूत आहे. बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे, मराठवाड्यात त्याची दाहकता अधिक पाहायला मिळते. त्यामुळं आम्ही पाहणी करण्यासाठी आलो आहोत. मोसंबी, डाळिंब आणि इतर फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन केला, पालकमंत्र्यांना फोन केला, मात्र ते उपलब्ध नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पिण्यासाठी पाणी नाही, पाण्याच्या पाण्याचं नियोजन देखील सरकारनं केलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांशी या सरकारला काहीच देणंघेणं नाही हे दिसून येतंय. धान्य कमी पडलं तर ते आपल्याला आणता येईल. मात्र, पाणी कुठून आणायचं?", असा संतप्त सवालही पटोलेंनी केला.
बियाणं घेताना सरकारला कमिशन जाते : "राज्यात बियाणांचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे. सरकारच्या मंत्र्यांना कमिशन देत असल्यामुळं दर अधिक वाढलेत. खत घेताना इतर वस्तू घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना खत दिली जात नाहीत. दुकानदारांना याचं कमिशन सरकारपर्यंत पाठवावं लागते. हा मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. बियाण्यांचे दर 834 इतके असताना 1100 रुपयांपर्यंत ते विक्री केले जाते. कंपन्या शेतकऱ्यांची लूट करताय, ती तातडीनं थांबवावी, त्यांना न्याय देण्याचं काम करावं. पीक विमा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. चार तारखेनंतर आम्ही पुन्हा एकदा पाहणी करू. तोपर्यंत योग्य उपयोजना झाल्या नाहीत, तर शेतकऱ्यांसह रस्त्यावरची लढाई आम्ही लढू," असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.
इतर प्रश्न महत्वाचे नाहीत : पुढं ते म्हणाले की, "राज्यात सध्या पुण्यातील प्रकरणावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ससून रुग्णालयात झालेल्या घडामोडी धक्कादायक आहेत. तर मनुस्मृतीबाबत झालेलं आंदोलन याला देखील राज्यात वेगळंच वळण लागलंय. मात्र, या सगळ्या प्रश्नांपेक्षा राज्यातील शेतकरी हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी आम्ही केलेल्या मागण्यांकडं सरकारनं अधिक गांभीर्यानं बघून उपाययोजना कराव्या", अशी मागणीही पटोले यांनी केली.
हेही वाचा -
- काळं कृत्य करणाऱ्यांसाठी ससून हॉस्पिटल फाइव स्टार हॉटेल झालं आहे का? नाना पटोलेंचा सवाल, पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार - Pune Hit And Run Case
- काँग्रेस हाय कमांडकडं काही पक्षांचे प्रस्ताव आलेत; नाना पटोलेंचं शरद पवारां प्रत्युत्तर - Lok Sabha Election 2024
- प्रतापराव भोसले यांच्या निधनानं सुसंस्कृत, निष्ठावान नेतृत्व हरपलं... नाना पटोले यांची प्रतिक्रिया - Prataprao Bhosale Death