मुंबई Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होत असून यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार रंगणण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत संख्याबळ असूनही काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची जादू चालल्याचं बोललं जात होतं. यंदाही 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच हे गुप्त मतदान असल्यानं घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळंच सावधगिरीचा पर्याय म्हणून राजकीय पक्षांनी आता हॉटेल डिप्लोमसीचा अवलंब केलाय. उद्धव ठाकरे गट, अजित पवार गट, भाजपा, शिंदे गट यांनी आपल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रयत्न : 12 जुलैला होणारी विधान परिषदेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्वाची असणारी आहे. अगोदर बिनविरोध होणारी ही निवडणूक आता प्रत्यक्षात होत असल्यानं घोडेबाजाराला उत आल्याची चर्चा आहे. त्यामुळंच मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून शरद पवार गट सोडला तर इतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केलीय. याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब (Anil Parab) म्हणाले, "निवडणुकीच्या अगोदर आमदारांना एकत्रित ठेवण्याची परंपरा आहे. मात्र, आमदार पळवले जाऊ शकतात. सरकार घोडेबाजार करण्यात हुशार आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय."
कुणी ताज तर कुणी ललितमध्ये ठेवले आमदार : उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटानं लोअर परेल येथील 'आयटीसी ग्रँड मराठा' या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्याची व्यवस्था केलीय. काँग्रेसनं हॉटेल 'इंटर कॉन्टिनेन्टल' इथं त्यांच्या आमदारांसाठी भोजनाची व्यवस्था केली असून त्यानंतर ते हॉटेलमध्ये राहतील की नाही, हे ठरवलं जाणार आहे. तर भाजपानं 'ताज प्रेसिडेन्सी' या हॉटेलमध्ये त्यांच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था केलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटान 'द ललित' या हॉटेलमध्ये त्यांच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था केली. तसंच यादरम्यान हे आमदार कोणाच्या संपर्कात राहतात? त्यांना भेटण्यासाठी कोण प्रयत्न करतंय? यावरही पक्षांची बारीक नजर असणार आहे.
हेही वाचा -
- विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष, छोट्या घटक पक्षांची मागणी वाढली; 'ही' मतं ठरणार किंगमेकर - MLC Election
- विधान परिषद निवडणूक घोडेबाजार होणार का; ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात - Vidhan Parishad election
- विधानपरिषदेच्या चार जागांचे आज निकाल लागणार, तीन मतदारसंघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण - Vidhan Parishad Election Result